शुभम सावंत,विरार
बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या : शिक्षिका आणि प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल,
आपली शिक्षण व्यवस्था कायम प्रकाशझोतात असते,परीक्षेचे पेपर फुटणे,परीक्षेत सर्रास कॉपी करणे,उत्तर पत्रिका गहाळ होणे,असले प्रकार आपल्या पाचवीला पुजले आहेत.शिक्षण विभागात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही.शिक्षणाचा सुमार दर्जा,शिक्षकांची अपुरी संख्या,त्यामुळे शाळेची पटसंख्या खालावणे व वेगाने बंद पडणाऱ्या शाळा इ. कारणामुळे आपले शिक्षण विभाग बदनाम झाले आहे. सध्या पालघर जिल्ह्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणाने आपल्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.
बारावी वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणी संबंधित शिक्षिका आणि महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात विरारच्या बोळींज पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षिकीने या उत्तरपत्रिका बेकायदेशीरपणे आपल्या घरी नेल्या होत्या,पण घराला आग लागल्यामुळे या उत्तरपत्रिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
२५ फेब्रु.रोजी शिक्षिकेने परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अनधिकृतरित्या आपल्या घरी नेल्या होत्या.एकूण १७५ उत्तरपत्रिका या घटनेत जळल्या.ही आग कशामुळे लागली याचा उलगडा अद्याप झालेला नाही.पण ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी,असा प्राथमिक अंदाज आहे.उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेत हा मोठा घोटाळा असल्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.चौकशीत दोषी आढळल्यानंतर संबंधित शिक्षिका आणि महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात बोळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण झाली होती.दरम्यान विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे.जळालेल्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय दिला जाईल.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,असे स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

