जव्हार प्रतिनिधी,
अपघातग्रस्त चालकाला आर्थिक मदतीचा हात,
समाजामध्ये संकटसमयी एकमेकांना आधार देणे,ही खरी माणुसकीची भावना आहे.याचे जिवंत उदाहरण जय हिंद चालक-मालक संघटनेने नुकतेच घालून दिले. संघटनेच्या एका सदस्याचा अपघात झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला आणि आर्थिक सहकार्य करून चालकाच्या कुटुंबाला दिलासा दिला.
जव्हार तालुक्यातील तसेच गुजरात सीमेलगत असलेल्या दादरानगर हवेली सीमेलगत असलेल्या रुईघर गावातील जय हिंद चालक-मालक संघटनेचा एक सदस्य आपल्या खाजगी जीपने रात्री घरी परतत असताना दुर्दैवी अपघाताला सामोरा गेला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीपचा मोठा अपघात झाला.स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत,त्याला सिल्वासा येथील विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र, उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च सांगितल्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले.या घटनेची माहिती मिळताच जय हिंद चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य एकत्र आले.त्यांनी आर्थिक मदतीसाठी निधी संकलन मोहिमेचे आयोजन केले. जव्हार,मोखाडा,विक्रमगड व वाडा येथे संघटनेच्या सदस्यांनी आपापल्या परीने मदत देऊन ४० हजार रु. ची रक्कम उभी केली व दोन दिवसापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलला भेट देऊन चालकाच्या कुटुंबीयांच्या हाती ही मदत सुपूर्द केली.मदत मिळताच कुटुंबीयांचे डोळे पाणावले. त्यांचा भार हलका झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.चालकाच्या कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की,” सध्या एवढा मोठा खर्च करण्याइतकी आमची आर्थिक परिस्थिती नव्हती.मात्र,जय हिंद चालक-मालक संघटनेने आम्हाला मोठा आधार दिला. त्यामुळे आम्ही संघटनेचे मनःपूर्वक आभार मानतो.” संघटनेचे कार्याध्यक्ष विश्वनाथ भोये यांनी सांगितले की,” चालक आणि वाहनमालकांसाठी संघटना,ही आधारस्तंभ असते.संकटाच्या काळात आम्ही सर्वांनी मिळून मदत करणे,हे आमचे कर्तव्य आहे.भविष्यात संघटना अधिक बळकट करणार असून,अशा कोणत्याही परिस्थितीत आमचे सहकारी बांधव एकटे राहणार नाहीत. आम्ही सगळे मिळून त्यांना सहकार्य करू.” यावेळी संघटनेचे अध्यक्ष देवराम चौधरी,उपाध्यक्ष दत्ता वाघ, तसेच पदाधिकारी बाबू भोये, कांतिराम दिघा,शंकर गोविंद, अरुण भोये,दीपक राऊत, महेश पवार आदी उपस्थित होते.जय हिंद चालक-मालक संघटनेच्या या मदतकार्यामुळे सामाजिक एकोपा आणि संघटनेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.संकटसमयी संघटित मदतीने कोणाच्याही अडचणी सोडवता येऊ शकतात,याचा प्रत्यय या निमित्ताने आला.

