दीपक मोहिते,
पालघर जिल्ह्यात कुणबी सेना व समविचारी संघटना जनआंदोलन उभारणार..
पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्न,समस्या,प्रलंबित विकासाचे प्रश्न,भ्रष्टाचार व भूमिपुत्रांना विस्थापित करण्याचे राज्य व केंद्र सरकारचे दिशाहीन धोरण,याविरोधात कुणबी सेना,आदिवासी एकता परिषद व समविचारी संघटना एकत्र येऊन जिल्ह्यात जनआंदोलन उभारणार असल्याची घोषणा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पालघर येथे केली.ते पालघर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालघर पूर्व भागातील ठाकूर सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील होणाऱ्या जनआंदोलना संदर्भात माहिती देताना म्हणाले,नव्याने जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर आम्हा जिल्हावासीयांना विविध प्रश्नी दिलासा मिळेल,आमचे दैनंदिन जीवनातील प्रश्न सुटतील,असे वाटले होते,पण आमचा भ्रमनिरास झाला.पण शासनाच्या या निर्णयाचा येथील भूमिपुत्रांना फायदा होण्याऐवजी शासकीय अधिकारी,ठेकेदार व राजकीय नेत्यांचेच उखळ पांढरे होत गेले.स्थानिक भूमिपुत्रांना सोयी-सुविधांपासून वंचित ठेवून त्यांना संपवण्याचे काम,या शासनाने केले.रस्ते,आरोग्य,शिक्षण,कृषी क्षेत्राचे अनेक प्रश्न आजही ” जैसे थे,” स्थितीत आहेत.भात खरेदी केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे,आदिवासींच्या जमिनी लुटण्यात येत आहेत.पर्यावरण व प्रदूषणाचे प्रश्न आ वासून उभे आहेत.डोंगर उजाड करणे व वन जमिनीवरील मातीची चोरी,आदी कारणामुळे लोकांना जगणं कठीण झाले आहे.त्यामुळे सरकारच्या या सर्व गलथान कारभाराविरोधात आम्ही जिल्ह्यातील सर्व समविचारी संघटना एकत्र येऊन व्यापक जनआंदोलन उभारणार आहोत.लवकरच त्यासंदर्भात माध्यमांना अवगत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तत्पूर्वी कुणबी सेनेचे नेते अविनाश पाटील यांचेही भाषण झाले.या पत्रकार परिषदेला आदिवासी एकता परिषदेच्या भूमिसेनेचे परशुराम सवरा व अन्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

