अनिल जगताप,मंत्रालय प्रतिनिधी,
” आनंदाचा शिधा,” चे कौतूक संपले,” लाडकी बहीण योजना,” विकासकामांना निधी मिळत नसल्यामुळे अनेक मंत्री नाराज,
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना,आता सरकारच्या गळ्याला फास ठरू पाहत आहे.गेल्या सहा महिन्यात सरकारने इतर अनेक विभागाचा निधी महिला ब बालकल्याण विभागाकडे वळवल्यामुळे अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.आमच्या विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या विकासकामांना निधी मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.अनेक मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी प्रश्न उपस्थित केले.मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यानी याविषयी कोणताही खुलासा केला नाही.
सरकारने लाडक्या बहीण योजनेचा पुढील हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय व आदिवासी विकासाचा अनुक्रमे ३०००/- व ४०००/- कोटी रु.चा निधी,महिला व बालकल्याण विभागाकडे नुकताच वळवला.त्यामुळे संबधित विभागाचे मंत्री पार वैतागून गेले आहेत.या दोन्ही विभागाच्या अनेक योजनांना मंजुरी मिळाली आहे,पण निधी अभावी त्या सुरू करता येत नाहीत.तसेच ठेकेदारांची कोट्यवधी रु.ची थकीत बिलेही देणे सध्या कठीण होऊन बसले आहे.अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आदिवासी विकास,सामाजिक न्याय व अन्य सात ते आठ विभागाचा कारभार ठप्प होईल,अशी भिती काही मंत्री खाजगीत व्यक्त करत आहेत.आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेवर सरकारने ३७ हजार कोटी रु.खर्च केले आहेत.या योजनेसाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी सरकार लवकरच दारूचे परवाने मुक्त हस्ते वाटप करण्याच्या तयारीत आहे.अनेक वस्तूंवर मागच्या दराने वाढीव कर लादण्यासाठी काय करता येईल,याचाही वरिष्ठ पातळीवर विचार करण्यात येत आहे.राज्याची आर्थिक स्थिती सतत खालावत चालल्यामुळे सरकारने ” आनंदाचा शिधा,” ही योजना देखील बासनात गुंडाळली आहे,तर लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रु.देण्याच्या घोषणेलाही सरकारने करकचून ब्रेक लावला आहे.

