दीपक मोहिते,
राज्य उष्णतेने फणफणले,
सावधान…! उष्णतेचा पारा ३७ अंशावर..
यंदा फेब्रु.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.आज पालघर जिल्ह्याचा पारा ३७ अंशावर गेल्यामुळे दुपारी सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.मे महिन्याच्या मध्यास तो ४० वर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय हवामान विभागाने यंदा उष्म्याचा कहर होणार असून एप्रिल व मे महिन्यात राज्यातील जनता या उष्णतेच्या लाटेत होरपळून निघेल,अशी भिती व्यक्त केली आहे.तसेच या काळात राज्याच्या अनेक जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.तसेच भूगर्भातील पाणीसाठ्यावरही विपरीत परिणाम होईल,असे सांगण्यात येत आहे.पालघर जिल्हा हा समुद्रकिनारी असल्यामुळे येथील हवामान दमट आहे.त्यामुळे उष्म्याच्या काळात घामाच्या धारा वाहतात.पालघर जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन होत असते.त्यामुळे जिल्हावासीयांना किमान तीन महिने प्रचंड उष्म्याला सामोरे जावे लागणार आहे.उन्हाळ्यात तलाव, विहिरीमधील पाण्याचे मोठ्याप्रमाणावर बाष्पीभवन होत असते,त्यामुळे अनेक गावातील विहिरी व तलाव कोरडेठाक पडतात.तसेच भूगर्भातील पाण्याचे साठेही आटत असल्यामुळे बोअरिंगना पाणी लागत नाही.बेसुमार वृक्षकत्तल, डोंगर खोदाई,वृक्ष लागवडीकडे झालेले दुर्लक्ष,आदी कारणामुळे पर्यावरणाचे संतुलन पार बिघडले असून त्याचा परिणाम ऋतुमानावर जाणवू लागला आहे.सध्या ३७ अंशावर असलेला उष्णतेचा पारा मेच्या मध्यास ४० वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

