सुरेश वैद्य, सफाळे
पालघर जिल्हा परिषदेत पाणी गुणवत्ता विषयक जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न,
राज्य पाणी व स्वच्छता मिशन तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय दिवसीय कार्यशाळा आज जिल्हा परिषद, पालघर येथे आयोजित करण्यात आली.ही कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा सभागृह येथे पार पडली.
कार्यशाळेत जल जीवन मिशन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा, पाणी गुणवत्ता परीक्षण, शुद्धीकरण प्रक्रिया, आरोग्यदृष्ट्या सुरक्षित पाणीपुरवठा,तसेच प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,प्रकल्प संचालिका रुपाली सातपुते,पाणी व स्वच्छतेचे प्रकल्प संचालक अतुल पारस्कर,कार्यकारी अभियंता ( पाणीपुरवठा ) राजेश पाध्ये इ.वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना १००% योजना मार्चअखेर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी या योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असे सांगितले.
“सर्व संबंधित विभागांनी एकत्रित काम केल्यास जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला देण्यात नळाद्वारे शुद्ध पाणी मिळेल.त्यामुळे जलजन्य रोग, मृत्यू दर आणि कुपोषण रोखण्यास मदत होईल.” असे मत यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी व्यक्त केले.
पाणी गुणवत्ता सुधारण्याच्या उपाययोजना व शुद्धीकरण प्रक्रिया,एफटके चाचणी व नमुना संकलन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन,डब्ल्यूक्यूएमएस व आयएमआयएस यांच्यातील परस्पर संबंध व माहिती अद्ययावत करण्याचे महत्त्व,विभागीय समन्वय व प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकारी-कर्मचारी कार्यशाळा,जल जीवन मिशन योजनांची सद्यस्थिती आणि उद्दिष्टपूर्ती या विविध विषयांवर कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात करण्यात आली.
या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल तसेच नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाला उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.पालघर जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामुळे भविष्यात जल स्वच्छतेसंदर्भात अधिक प्रभावी अंमलबजावणी होण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली.

