संदीप जाधव,बोईसर
आसनगाव येथे कोट्यवधी रु.चा जमीन घोटाळा,जनआंदोलन उभारण्याचा आव्हाडांचा इशारा,
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आसनगाव येथे शासकीय जमिनीच्या बेकायदेशीर व्यवहारावरून सर्वत्र खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ट्विटरवरून (X) वरून चांगलेच सुनावले आहे.
“शासन आदेशांचे उल्लंघन करून डहाणू उपनिबंधक कार्यालयाने शासकीय जमीन विकण्याचा प्रकार केला आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गुंतले असल्याने पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई होत नाही.मुख्यमंत्री साहेब,हे प्रकरण जर दडपले जात असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे ,” असे आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी ” हा सरळसरळ सत्तेचा गैरवापर आहे.सरकारच्या आदेशांना खुंटीला टांगून जमीन खरेदी-विक्रीचे धंदे सर्रास सुरू आहेत.फडणवीस सरकारने या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला,तर जनतेसमोर या प्रकरणाचा पर्दाफाश केला जाईल.” असा इशारा दिला आहे.
पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः १० डिसें.२०२४ रोजी आदेश काढून अशा प्रकारच्या व्यवहारांवर बंदी घातली होती. मात्र,तरीही १ जाने.२०२५ रोजी हा व्यवहार नोंदवला गेला.यावर आव्हाड म्हणाले, ” पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप या गैरव्यवहारावर कारवाई केलेली नाही.भाजप नेत्यांच्या दबावामुळेच अधिकारी शांत आहेत का ? ”
शासनाच्या जमिनीचा असा बेकायदेशीर व्यवहार उघडकीस आल्यानंतरही कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे.राज्य सरकारने तातडीने हे व्यवहार रद्द करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलन उभारणार,असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.

