शुभम सावंत,विरार
वसई विरार शहर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनाची उच्चस्तरीय समितीद्वारा चौकशी होणार,
वसई विरार शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाचा घोटाळा आ.राजेंद्र गावित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे. संबंधित मंत्रीमहोदयांनी उच्च समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल,असे आश्वासन दिले आहे.
यावेळी आ.गावित म्हणाले की,वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन संबंधित २४ कोटी ६४ लाख रु.चा गैरव्यवहार झाला असल्याची माहिती आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली.यामध्ये भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे लेखापाल ( ऑडिट-१ ) महाराष्ट्र यांच्याकडील परीक्षण अहवालात उक्त प्रकल्पाचा कोणताही उपयोग न होता २४ कोटी ६४ लाख खर्च केला गेला असल्याचे उघडकीस आले आहे.सदर प्रकल्प फसल्यामुळे हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याद्वारे वसई विरार शहर महानगरपालिकेला नोटीस बजावली असून प्रति महिना २० लाख रु.दंड ठोकावला आहे.तसेच या प्रकल्पाचे मुंबई आयआयटी पवई यांच्या माध्यमातून त्रिसदस्य संस्था परीक्षण झाले असून त्याचा अहवाल ऑडिट रिपोर्ट माहे मे २०१७ मध्ये सादर करण्यात आला होता.या तीनही अहवालानुसार शासनाने कार्यवाही करावी आणि उच्चस्तरीय समिती स्थापन करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आ. राजेंद्र गावित यांनी जोरदार मागणी केली. मंत्रीमहोदयांनी लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करून या घोटाळ्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिले.

