संजय लांडगे,वाडा
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी वाड्यात भव्य रॅली
बिहार राज्यातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा वाडा तालुका शाखा व वाडा तालुक्यातील बौद्ध समाजातर्फे आज वाडा येथील खंडेश्वरीनाका येथून तहसिल कार्यालयावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रासह संपुर्ण देशभरातील बौद्ध समाजाचे बिहार राज्यातील पवित्र बोधगया महाबोधी महाविहार हे आस्थेचे व श्रद्धेचे स्थान आहे.परंतु सध्या अस्तित्वात असलेला बोधगया मंदिर अधिनियम १९४९ हा कायदा भारतीय संविधानातील अनुच्छेद १३,२५ आणि २६ मध्ये दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्य व संस्थात्मक व्यवस्थापनेच्या मुलभूत अधिकारांचे सरळसरळ उल्लंघन करतो. महाबोधी महाविहार हे केवळ बौद्ध समाजाचे धार्मिक व ऐतिहासिक वारसास्थळच नसून,संपूर्ण जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान आहे,असे असतांना बौद्ध समाजाला त्यांच्या स्वतःच्या धर्मस्थळांचे संपूर्ण व्यवस्थापन करण्याचा हक्क नाकारला जात आहे.ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे,त्यामुळे संपुर्ण बौद्ध समाजामध्ये असंतोष व नाराजी निर्माण झाला आहे.
या पार्श्वभुमीवर,वाडा तालुक्यातील बौद्ध समाज बांधवानी न्याय मिळावा यासाठी वाड्याचे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाकडे विंनती करणारे निवेदन दिले.
महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीने शिफारस करून बिहार सरकारला विनंती करावी की बोधगया मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा आणि महाबोधी महाविहारांचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाला बहाल करावे.अशी विनंती यावेळी करण्यात आली.
खंडेश्वरी नाका येथून निघालेल्या रॅलीत समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर तहसील कार्यालयसमोर अनेक बौद्ध बांधवानी आपले मनोगत व्यक्त केले.

