सचिन परब,विरार
करवाढ मागे घ्या,अन्यथा तीव्र आंदोलन- मनसेचा इशारा
वसई-विरार शहर महानगरपालिकेने वर्ष २०२५-२६ या वित्तीयवर्षात पाणीपट्टी २५ टक्के,मालमत्ता करात ५-७ टक्के वाढ जाहीर केली आहे.पालिकेने केलेल्या या करवाढीविरोधात वसईत संतापाची लाट उसळली आहे. पालिकेच्या करवाढी विरोधात वसईतील राजकीय व सामाजिक वातावरण तापत चालले असून वसईत जनआंदोलन होण्याची शक्यता आहे.
आज मनसेनेही मनपाच्या करवाढ विरोधी आंदोलनात उडी घेतल्याने या आंदोलनाला अधिक बळकटी मिळाली आहे.मनसे नेते अविनाश जाधव,वसई विरार अध्यक्ष प्रविण भोईर यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले.या निवेदनात सामान्यांच्या माथी मारलेली करवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
वसई विरार क्षेत्रात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे.अवैध बांधकामांनी कळस गाठला आहे.पाणीटंचाई,अस्वच्छता, खराब रस्ते अशा व अन्य विविध समस्यांनी प्रशासकीय राजवटीत डोकेवर काढले आहे.दैनंदिन वसईकर विविध समस्यांना तोंड देत आहेत. मनपातर्फे होणाऱ्या विकासकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. टक्केवारीच्या गणितात विकासकामांचा दर्जा ढासळत चालला आहे.परंतु या सर्व बाबींकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करून सर्व सामान्य वसईकरांच्या माथी मात्र करवाढीचा बोझा लादत असल्याचा आरोप प्रवीण भोईर यांनी केला आहे.मनसेने आज आयुक्तांची भेट घेवून वाढीव कर लादण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा आणि सर्व सामान्य वसईकरांना दिलासा द्यावा,अशी मागणी केली आहे.पालिकेने ही करवाढ तातडीने मागे न घेतल्यास मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रवीण भोईर यांनी दिला आहे.

