नवीन देसाई,वाशी,
शिंदे यांच्यामागे आणखी एक शुक्लकाष्ठ,
राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.दोन आठवड्यापूर्वी त्यांनी शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार भरवून त्यांनी शिंदे यांच्याविरोधात शड्डू ठोकले होते.आता त्यांनी शिंदे यांच्या एका निर्णयाला आव्हान दिले आहे.मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी महानगरपालिकेत समाविष्ट करणारा अध्यादेश जारी केला होता.तो अध्यादेश रद्द करण्याची मागणी नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.ही सर्व गावे पूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेत होती,पण मालमत्ताकराचा भार पडल्यामुळे ही गावे बाहेर पडली होती.पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांनी अध्यादेश करून ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत टाकली होती.पण त्यावेळी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत होते,त्यामुळे नाईक यांनी त्यावेळी विरोध केला नाही,पण आता त्यांनी हा अध्यादेश रद्द करण्यात यावा,यासाठी कंबर कसली आहे.
त्यामुळे त्यांनी या अध्यादेशाला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे.नवी मुंबईकरांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकून ही गावे जर महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात येत असतील तर त्यास आमचा विरोध आहे.हा नवी मुंबईच्या नागरिकांवर अन्याय आहे.जर या गावाचा समावेश करायचा झाल्यास राज्य शासनाने सर्वप्रथम या गावातील अनधिकृत बांधकामे हटवावीत व महानगरपालिकेला साडेसहा हजार कोटी रु.द्यावे,अशी मागणी केली आहे.या प्रश्नी गणेश नाईक यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून,कोणत्याही परिस्थितीत या प्रश्नी माघार नाही,असे स्पष्ट केले आहे.शिंदे यांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न असून नाईक यांच्या या भूमिकेमागे कोण आहे ? हे सांगायला नको..

