वसंत भोईर,वाडा
देहर्जे प्रकल्पातील बाधितांच्या पुनर्वसनासाठीच्या भूसंपादनात गैरव्यवहार,
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील देहर्जा मध्यम धरण प्रकल्पामुळे विस्थापित होणा-या धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील भूसंपादन व मूल्यांकन समितीद्वारे थेट वाटाघाटीद्वारे खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप पीक ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र जोगवला यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईकांकडे तक्रार केली आहे.
देहर्जे प्रकल्प हा वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.
विक्रमगड तालुक्यात मौजे सुकसाळे येथे या प्रकल्पाचे काम सुरु आहे.या प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात जांभे,साखरे, खुडेद ही एकूण तीन आदिवासी महसुली गावे येत असून चार पाडे अंशतः बाधीत होत आहेत.बाधित होणाऱ्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी गावामध्ये पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे व समितीवरील अशासकीय सदस्यांनी केलेल्या मागणी नुसार बाधित गावांमध्ये कुटुंबनिहाय सर्वेक्षण करण्यात आले.त्यानुसार जिल्हा पुनर्वसन अधिकारी,पालघर यांचे कार्यालयाकडून देहर्जे मध्यम धरण प्रकल्पाच्या मौजे साखरे,खुडेद व जांभे या गावाचे पुनर्वसनासाठी जमीन विक्री करण्यास इच्छुक असणारे जमीन मालक अथवा
त्यानुसार बाधित धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमीन विकण्यास इच्छुक असलेले १) स्वनिल प्लांटशन प्रा.ली. मौजे सारशी, ता. वाडा २) ब्युटीफुल अग्रो प्रोडक्टस ली. मौजे खरीवली (कोहोज), ता. वाडा ३) वाडा हायटेक वेव्हिंग पार्क लि. ४) ऋषीकुमार महावीरप्रसाद बरासिया ५) झावरमल भगवानराम जांगीड, ६) वासुदेव भगवानदास मलकानी या सहा जणांचे देकार विहित मुदतीत प्राप्त झाले होते. त्यामुळे या सहा इच्छुकांकडून जमीन खरेदी करणे अपेक्षित असताना त्यांना डावलून विहित मुदतीत अर्ज न करणाऱ्या खरीवली येथील मे. शक्ती फोर्चुन तर्फे पार्टनर नेहलकुमार हसमुखराय गांधी व हर्ष नेहलकुमार गांधी यांची २९.८६.८० हेक्टर आर. जमीन उप विभागीय अधिकारी,वाडा कार्यालयाने थेट सुमारे ६७ कोटींना खरेदी केल्याचा आरोप जोगवला यांनी केला आहे.
विहित मुदतीत कोणताही विनंती अर्ज न करणाऱ्या शक्ती फोर्चूनतर्फे पार्टनर नेहलकुमार हसमुखराय गांधी व हर्ष नेहलकुमार गांधी यांची जमीन जिल्हाधिकारी पालघर, यांचे अध्यक्षतेखाली जमीन खरेदी व मूल्यांकन समितीने संगनमत करून चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी प्रक्रिया पार पाडून गैरव्यवहार केला आहे.यात जागामालक व अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतल्याने हा बेकायदेशीरपणे खरेदी व्यवहार असून तातडीने रद्द करून या गैरव्यवहारात सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई कारवाई करण्याची मागणी जोगवला यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

