दीपक मोहिते,
भितीने व्याकुळ झालेल्या एका बापाचे मुख्यमंत्र्यांना पत्र,
सध्या राज्यात जे काही चालले आहे,ते पाहून व्यथित झालेल्या एका बापाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून माझ्या मुलाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,अशी गळ घातली आहे.
ते आपल्या पत्रात काय म्हणतात ते पहा,” माझ्या अकरा वर्षाच्या मुलाने मला काल प्रश्न विचारला ” आप्पा मी मोठा झाल्यावर कलेक्टर होऊ का ? की त्यापेक्षाही मोठा अधिकारी ? त्याच्या या प्रश्नाने मी बुचकळ्यात पडलो.कारण बीडची एक ना अनेक प्रकरणे माझ्या डोळ्यासमोर तरळत होती.वाल्मिक कराड,त्याची खतरनाक टोळी,खोक्या,धनंजय मुंडे,सुरेश धस,
मनात विचार आला की त्याला आयपीएस किंवा आयएएस अधिकारी बनवायचं,आणि असल्या फालतू व मानवजातीला काळिमा फासणाऱ्या लोकांची चाकरी करायला लावायची ? त्यामुळे मुख्यमंत्री साहेब,माझ्या मुलाच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच द्या..
एका मुलाच्या भवितव्याबाबत व्याकुळ झालेल्या बापाच्या वेदना व व्यथा,या पत्रातून ध्वनित होत आहेत.त्या मुलाच्या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ शकत नाहीत,कारण राज्यातील परिस्थिती पार हाताबाहेर गेली आहे.या राज्यात कलेक्टर,पोलीस अधीक्षक जर माफिया,डॉन व हत्यारे यांच्या घरी पाणी भरण्याचे काम करत असतील तर सारं काही संपल्यात जमा आहे,असेच म्हणावे लागेल.या बापाचे हे पत्र खरंच तथाकथित राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

