सुरेश काटे,तलासरी
वर्षानंतरही राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवटच,
अपघाताचे प्रमाण वाढले
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या वर्षभरापासून काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असले तरी अजूनही उड्डाणपुल,सेवा रस्ते इ. कामे काम शिल्लक आहेत.महामार्गावरील अपघात कमी व्हावेत व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा,यासाठी सध्या काँक्रीटीकरण करण्यात येत असले तरी कामाचे नियोजन नसणे व हलगर्जीपणा इ. कारणामुळे गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
चारोटी महामार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये मेंढवन खिंड ते अच्छाड असा ५१ कि.मी.लांबीचा महामार्ग येतो. गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत या भागात १०५ अपघाताच्या घटना घडल्या आहेत.या अपघातामध्ये ५७ नागरिकांना आपले जीव गमवावा लागला तर ४४ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.मेंढवन,चारोटी, महालक्ष्मी,धानिवरी,आंबोली, तलासरी उड्डाणपूल,सुत्रकार फाटा अशा विविध ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.महामार्गावर अपघात होण्यामागे सर्वात मोठे कारण हे अनेक ठिकाणी असलेले अपूर्ण काम व वाहनचालकांचा बेशिस्तपणा आहे.
महामार्गावर अपघात होऊ नये,यासाठी महामार्ग पोलीस बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करतात.गेल्या एप्रिल महिन्यापासून विरुद्ध बाजूने वाहन चालविणे,भरधाव वेगाने वाहन चालवणे,सीटबेल्ट न लावणे,अशा विविध १५ हजार ६०० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यामधून ४५ लाख रु.दंड आकारण्यात आला आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असली तरीही मात्र अपघातांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी विविध ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत.महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.अपघात होत असतानाही ठेकेदार टोल मात्र वसूल करत आहेत.
कोट -:
एप्रिल 2024 पासून महामार्गावर अपघात होऊ नयेत यासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पंधरा हजार सहाशे वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यामधून जवळपास ४५ लाख रु.चा दंड आकारण्यात आला आहे.वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. –
विजय पराड ( सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग)

