शुभम सावंत विरार,
वसई विरार शहर महानगरपालिकेस इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानांकन,
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त देशातील १३ किनारी राज्यामध्ये राज्य सरकार/स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम/मोहिम २१ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्याचे पर्यावरण व हवामान बदल विभाग,राज्य शासन यांनी निर्देश दिले होते.राष्ट्रीय किनारपट्टी कचरामुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे,जागतिक महासागर आणि जलमार्गांचे जतन व संरक्षण करण्याबद्दल लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे,असा हा दिवस साजरा करण्यामागे मुळ उद्देश होता.त्याअनुषंगाने २१ सप्टें.२०२४ रोजी राजोडी बिच,विरार ( पुर्व ) येथे आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका व गो-शुन्य प्रा.लि.यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबवण्यात आली होती.
सदर मोहिमे अंतर्गत शहरातील स्वयंसेवक,शाळा, महाविद्यालये,एनसीसी व एनएसएस विद्यार्थी,महिला बचतगट, लोकप्रतिनिधी,पत्रकार , सामान्य नागरीक,तसेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग,असे एकुण १५ हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.एकुण ५३ मेट्रिक टन कचरा संकलन करून त्यातील ६६२ कि.ग्रा.प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकल करण्याचे प्रात्यक्षिक नागरीकांना दाखवण्यात आले होते.
इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये १ ) सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग २) सर्वोच्च कचरा संकलन तसेच ३) प्लास्टिक कचऱ्याचे लाईव्ह रिसायकलिंग या तीन श्रेणीमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे,असे नानासाहेब कामठे,उपायुक्त,घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी सांगितले.
वसई विरार शहराला विस्तीर्ण निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभला आहे.किनारपट्टी स्वच्छता मोहिमेतून स्वच्छता, कचऱ्याचे विलगीकरण, रिसायकल,पुनर्वापर, प्लास्टिकचा कमीत कमी वापर आदि संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने केला आहे.घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे सदर उपक्रम राबवण्यात आला होता.

