दीपक मोहिते,
नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यावर केवळ भाजपचाच प्रभाव,
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजना संदर्भात बोलावण्यात आलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते.तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदारांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.त्यामुळे मंत्रालयात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.या कुंभमेळ्यावर भाजपचे वर्चस्व राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आज झालेल्या बैठकीला केवळ जलसंपदामंत्री गिरीष महाजन उपस्थित राहिल्यामुळे सर्वांच्या भुवया वर गेल्या आहेत.बैठकीला त्यांनी हजर राहणे,म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर त्यांची वर्णी लागणार,अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
२०२७ मध्ये नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती.या बैठकीचे जिल्ह्यातील तीन पैकी एकाही मंत्र्याला निमंत्रण नसल्याने ते अनुपस्थित राहिले.याशिवाय शहरातील आ.देवयानी फरांदे,सीमा हिरे,राहुल ढिकले,सरोज अहिरे, इगतपूरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आ. हिरामण खोसकर,नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खा.राजाभाऊ वाजे यांनाही बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.वास्तविक,सिंहस्थ कुंभमेळ्यात लाेकप्रतिनिधी आणि संस्थांची महत्त्वाची भूमिका असते.पण हा कुंभमेळा आपल्या अधिपत्याखाली व्हावा, यासाठी भाजपचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.दुसरीकडे नाशिक जिल्हा पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
सिंहस्थ-कुंभमेळा तयारी आढाव्याची आज दुसरी बैठक होत असून,या बैठकीचे देखील मंत्री,आमदार,खासदारांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.२०१५ च्या कुंभमेळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालिन कुंभमेळा आयोजनात मंत्री गिरीष महाजन यांचे नियोजन होते.आताही या दोघांकडूनच आगामी सिंहस्थ-कुंभमेळा बैठका लावण्यात येत असल्यामुळे महायुतीच्या घटक पक्षात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.सिंहस्थ-कुंभमेळ्यावर केवळ भाजपचा प्रभाव असल्याची चर्चा यानिमित्त रंगत आहे.
नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम असल्याने,महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे करण्याचा सिलसिला सुरू झाला आहे.जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दोन दिवसात पालकमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले होते.मात्र हा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही.

