वसंत भोईर,वाडा
पळसाच्या पानांची पत्रावळ्या झाल्या जेवणावळीतून हद्दपार,
विवाह सोहळा,सप्ताह,पूजा व धार्मिक कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या पळसाच्या पानांच्या पत्रावळी हल्ली हद्दपार झाल्याचे चित्र आता ग्रामीण भागातही सर्रास पहावयास मिळत आहेत.तर आधुनिकीकरणाच्या युगात प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळींना समाजात अधिक पसंती मिळू लागली आहे.
विवाह सोहोळ्यात व इतर धार्मिक कार्यक्रमात आता पळसाच्या पानाच्या पत्रावळींची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली आहे.त्यामुळे स्थानिकांचे पत्रावळी तयार करणे व पळसाची पाने जंगलातून आणून व्यापाऱ्यांना विकणे, असा अल्प रोजगार देणारा व्यवसाय हा मागणी कमी होत असल्यामुळे भूतकाळात जमा झाला आहे.
पुरातन काळापासून मंगलकार्याच्या जेवणावळीत पळसाच्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या
पत्रावळींचा वापर केला जात होता.आयुर्वेदीक गुणधर्म असलेली पळसाच्या पानाची पत्रावळी सध्या लोप पावत असून,शहरातील पानटपरीवालेही सध्या पार्सल व मावा पळसाच्या पानात बांधून न देता कागद किंवा प्लास्टिकमध्ये बांधून देत असतात.त्यामुळे पळसाच्या पानांची मागणी आपोआपच घटली आहे.परिणामी,जंगल परिसरातील स्थानिकांचा रोजगाराचे साधन असलेला हा व्यवसाय बंद झाला आहे.
पळसाच्या पानांची पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाड्याच्या झाडाच्या काडीचा वापर होत असतो. लिंबाड्याच्या झाडाला आयुर्वेदात मोठे महत्त्व प्राप्त आहे.पळसाच्या पानांना कीड लागत नाही,तसेच या पत्रावळी त्या काळात स्वस्तात उपलब्ध होत असत. कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना ताटात जेवण न देता पत्रावळीत सामूदायिक जेवण दिले जात होते. मात्र,सध्या आधुनिकीकरणाच्या युगात ग्रामस्थ पळसाच्या पानांऐवजी प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या pपत्रावळींचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत.परिणामी स्वस्त व आयुर्वेदीय महत्त्व असणारी पळसाच्या पानांची पत्रावळी आता हद्दपार झाल्या आहेत.
पळसाच्या पानांनी बनवलेल्या पत्रावळीत जेवणाचा स्वाद हा वेगळाच असायचा,असे जुने- जाणते वयोवृद्ध नागरिक आजही अभिमानाने सांगत असतात. कारण पळसाच्या पत्रावळीला आयुर्वेदीक गुणधर्म असल्याने जेवण लवकर पचत असे.अशी विविध गुणधर्म असलेली पळसाच्या पानांची पत्रावळी आता हद्दपार झाली आहेत.फॅशन या गोंडस नावाखाली शरीरास अत्यंत हानिकारक असलेल्या थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळींचा वापर जेवणावळींमध्ये आता मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. हा बदल पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याचे जुन्या मंडळीचे म्हणणे आहे.

