संदीप जाधव,बोईसर
अज्ञात हिंस्त्र जनावराचा हल्ला; १४ बकऱ्या मृत्यूमु,परिसरात भितीचे वातावरण,
पालघर – मनोर पूर्वेस काटाळे गावात अज्ञात हिंस्त्र प्राण्याने शेळ्याच्या गोठ्यात हल्ला करून १४ बकऱ्यांचा फडशा पाडला.काही बकऱ्यांचे मृतदेह बंदिस्त गोठ्याबाहेर ओढल्याच्या खुणा आढळल्या आहेत.या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनोर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या काटाळे गावी नदीच्या काठी किरण पाटील यांच्या शेतात बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी बकऱ्यांना चारापाणी देण्यासाठी गेले असता, गोठ्यात भीषण दृश्य दिसून आले.१४ बकऱ्या मृतावस्थेत सापडल्या होत्या,तर काही जखमी अवस्थेत तडफडत होत्या.
यातील काही बकऱ्यांचे मृतदेह गोठ्याबाहेर ओढून नेल्याच्या खुणा आढळून आल्या, त्यामुळे हल्ला करणारा प्राणी नेमका कोणता याचा तपास सुरू आहे.
घटनास्थळी आढळून आलेल्या पायांच्या ठशांवरून हल्ला बिबट्याने हल्ला केला असावा,असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. अलीकडे पालघर आणि आसपासच्या ग्रामीण भागात वन्यप्राण्यांची वस्ती वाढली असून, ते नागरी वसाहतीमध्ये शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी सुरू केली आहे.हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला, याचा शोध घेतला जात आहे.
यापूर्वीही पालघर परिसरात बिबट्याच्या वावराच्या घटना घडल्या असून,शेती आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
वन्यप्राणी मानवी वसाहतीमध्ये शिरून हल्ले करू लागले आहेत,त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. वनविभागाने संशयित प्राण्याचा शोध घेऊन सुरक्षा व्यवस्था वाढवावी,अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो, असे नागरिकांचे मत आहे.

