दीपक मोहिते,
दिल्ली विधानसभा निवडणूक : सकाळपासूनच मतदानाला वेग,
आज सकाळी सात वाजल्यापासून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.एकूण ७० जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत १३ हजार ७६६ मतदानकेंद्रावर सुमारे १ कोटी ५६ लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत.एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून भाजप व आम आदमी पार्टी,या दोन तुल्यबळ पक्षात सरळ लढत होत आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील रिंगणात आहे,पण या पक्षाचा फारसा प्रभाव पाहायला मिळत नाही.
दिल्लीची राजसत्ता खेचून आणण्यासाठी भाजप पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरला आहे.तर आम आदमी पार्टीही तेवढ्याच ताकदीने त्यांना रोखण्यासाठी सज्ज झाली आहॆ.
मतदानाच्या वेळी संघर्ष होण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाने अर्धसैनिकांच्या २२०,दिल्ली पोलिसांचे ३५ हजार जवान व १९ हजार गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले आहेत.७० विधानसभा मतदारसंघातील सुमारे २ हजार ९८८ मतदानकेंद्रे ही संवेदनशील मतदानकेंद्रे म्हणून जाहीर झाली आहेत.त्यामुळे या मतदानकेंद्रावर पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली आहॆ.कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही ओखला विधानसभा मतदारसंघात दोन गटात जोरदार संघर्ष निर्माण झाला.प्रचार संपल्यानंतरही प्रचार केल्याबद्दल काही ठिकाणी उमेदवारांवर तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
मतदारांनी सकाळपासूनच मतदानकेंद्रावर मतदानासाठी रांगा लावल्या आहेत.या निवडणुकीच्या प्रचारात मद्य घोटाळा,मुख्यमंत्र्याचा बंगला, मोफत वीज व पाणी,इव्हीएम, रोहिंग्या,बांगला देशी,प्रदूषण,मतदारयादीतील सावळागोंधळ,कायदा व सुव्यवस्था,इ.ज्वलंत विषय, हाताळण्यात आले.२०२५ साली झालेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला ५३ तर मते तर भाजपला ३८ % मते मिळाली होती.त्यावेळी झालेल्या सरळ लढतीत आपने ७० जागापैकी ६२ निर्विवाद विजय मिळवला होता,तर भाजपच्या गाडीला ०८ वर ब्रेक लागला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला तर खातंही उघडता आले नव्हते.या निवडणुकीचे निकाल कसे लागतील, याविषयी दिल्लीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहॆ.भाजप व आम आदमी पार्टीचे दिग्गज नेते लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी कार्यकर्त्यासोबत रस्त्यावर उतरले आहेत.

