अनिल वैद्य,नाशिक,
तृणधान्याचे महत्व लोकाभिमूख होण्यासाठी
शासनस्तरावर प्रयत्न करणार- कृषीमंत्री कोकाटे,
नाशिक,तृणधान्यांमधील पोषणमुल्यांमुळे त्यांचे आहारातील आरोग्यविषयक महत्व अनन्यसाधारण आहे.हे लक्षात घेवून नागरिकांनी दैनंदिन आहारात तृणधान्यांचा समावेश वाढवणे आवश्यक आहे.तृणधान्याचे महत्व अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने तसेच जिल्हा व तालुकास्तरावर तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील,असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले.
कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालय नाशिक यांच्यातर्फे उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय गंगापूर रोड,नाशिक येथे आयोजित ” मिलेट महोत्सव-२०२5,” कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी,महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणेचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे,कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय नाशिकचे उपसरव्यवस्थापक एस.वाय. पुरी,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डी.भाकरे,मिसेस इंडिया इंटरनॅशनल डॉ.शुभदा जगदाळे,प्राचार्य विलास देशमुख यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषीमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की,आहारात पौष्टिक तृणधान्याची व्याप्ती वाढवून येणारी सदृढ पिढी निर्माण करण्यासाठी कृषी व पणन विभागाशी सलग्न सर्व विभागांना सर्वोतोपरी प्रयन्त करावे लागणार आहेत. देशातील ५० टक्के नागरिक हे शेती व्यवसायाशी संबंधित असून शेतीमध्ये अनेक आमुलाग्र बदल होतांना दिसत आहेत.शेतीतील नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून नवीन विकसित वाण,पीकपद्धती विकसित होत आहेत.या शेती उत्पादकाना त्यांचे गाव, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी विक्री व्यवस्था व बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पणन मंत्री यांच्यासमवेत चर्चा करून शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.तसेच मिलेट महोत्सवासोबत जी कृषी प्रदर्शने जिल्ह्यासोबत तालुका व गाव पातळीवरही व्हावीत.तसेच या प्रदर्शनांची नागरिकांमध्ये माहिती होण्यासाठी जनजागृती करावी,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कृषी मंत्री ॲड.कोकाटे यांच्या हस्ते फित कापून तीन दिवसीय ” मिलेट महोत्सव-२०२५,” उद्घाटन झाले.यावेळी महर्षी उदाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास त्यांनी माल्यार्पण केले.तत्पूर्वी कृषी मंत्री ॲड.कोकाटे यांनी तृणधान्य महोत्सवाच्या निमित्ताने तृणधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देत स्टॉलधारकांशी संवाद साधला.यावेळी उपसरव्यवस्थापक पुरी व प्राचार्य डॉ.भाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.
उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित ” मिलेट महोत्सव-२०२५,” २ फेब्रु.२०२५ पर्यंत नागरिकांसाठी सुरू असणार आहे.या ठिकाणी तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचे ३० स्टॉल उभारण्यात आलेले आहे.यात नाशिकसह,सोलापूर, जळगाव,सातारा,नांदेड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर,धुळे,पुणे जिल्ह्यातील समूह सहभागी झाले आहेत.ग्राहकांना ज्वारी, बाजरी,नाचणी,भगर ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ तसेच ज्वारीचा रवा,बाजरीच्या लाह्या,रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, भाकरवडी,शेवया,नुडल्स, आईस्क्रिम,खाकरा,शेव, चिवडा,रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविण्यपूर्ण अशी उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.याबरोबरच मिलेट उत्पादन,मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने,आरोग्यविषयक महत्व या विषयी नामांकित तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्र,प्रश्नमंजुषा,अनुभव कथन,असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

