दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
ईडीच्या जाळ्यात वसई – विरार भागातील बडे मासे गावणार ?
वसई विरार भागातील काही लोकप्रतिनिधी,बांधकाम विकासक,महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व बांधकाम/ पाणीपुरवठा कंत्राटदार ईडीच्या रडारवर असून या सर्वांना ईडीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.महानगरपालिकेत काही वर्षांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार ( १२२ कोटी रु.) पाणीपुरवठा व बांधकाम विभागात लोकप्रतिनिधी व एका अधिकाऱ्यांकडून झालेला प्रचंड भ्रष्टाचार,तसेच ज्या बिल्डर्स व लोकप्रतिनिधींनी वाधवान बांधकाम समूहाशी आर्थिक व्यवहार केले आहेत,ते सारे आता ईडीच्या रडारवर आले आहेत.लवकरच या सगळ्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याचे कळते.
अडीच वर्षांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पहाटेच्या सुमारास एका उद्योग समूहावर धाड टाकली होती.आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ईडीने डोकं वर काढले आहे.नायगाव पूर्व भागात एका जमिनीच्या व्यवहारात शेकडो कोटींची डील करणारा मुंबईचा एक उद्योग समूह देखील ईडीच्या रडारवर आला आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी एका भाजपच्या नेत्याने या सर्व प्रकरणी ईडीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही ईडीने केली नव्हती.पण आता त्यांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे.काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेत १२२ कोटी रु.चा आर्थिक घोटाळा झाला होता,पण तो दडपण्यात आला होता,ज्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांने तो उघडकीस आणला होता,त्याच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता पुन्हा चौकशी करण्यात येत आहे.ज्या बिल्डर्सने वाधवान उद्योग समूहाच्या एचडीआयएल या बांधकामात आर्थिक गुंतवणूक केली,त्यांच्याही मागे आता शुक्लकाष्ट लागणार आहे.वसई-विरार परिसरात ईडीची वक्रदृष्टी पडल्याचे वृत्त पसरल्यानंतर लोकप्रतिनिधी,
महानगरपालिकेचे वरीष्ठ अधिकारी,कंत्राटदार व बांधकाम व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.दुसरीकडे ही अफवा असून या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याची आवई काही जण उठवत आहेत.पण यासंदर्भात लवकरच ईडीच्या कारवाईला सुरुवात होणार असल्याचे काही बांधकाम व्यवसायिकांचे म्हणणे आहे.तसेच काही वर्षांपूर्वी झालेला २५ हजार कोटी रु.चा एफएसआय घोटाळा देखील ईडीच्या रडारवर आला असल्याचे वृत्त आहे.

