दीपक मोहीते,
स्वच्छ भारत अभियानाची ग्रामीण भागात होणार प्रभावी अंमलबजावणी,
जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून अनेक गावे स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श होत आहेत. जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायतींमधील ८९८ गावांपैकी ७०३ गावे ओडीएफ प्लस मॉडेल झाली आहेत. १५ व्या वित्त आयोगातील बंधित निधीमधून जास्तीत जास्त निधी स्वच्छतेच्या कामावर खर्च करण्याचे निर्देश पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.तसेच तालुका स्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात यावेत,तसेच गावापातळीवर स्वच्छतेच्या सुविधा कार्यरत राहण्यासाठी देखाभाल दुरुस्तीकरीता प्राधान्य द्यावे,अन्यथा कारवाई करण्यात येईल.अशी तंबीदेखील यावेळी अधिकारी वर्गाला दिली.
स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) चा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील सर्व गावांत दृष्यमान स्वच्छता ठेवून नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे हा आहे. याकरीता सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे.त्यानुसार जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायती क्षेत्रातील ८९८ गावापैकी ७०३ ओडीएफ प्लस मॉडेल झाली आहेत.
तसेच ग्रामपंचायतींनी २०२५-२६ चा गाव कृतीआराखडा तयार करताना स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) व १५ व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून सार्वजनिक कंपोस्ट पोस्ट,लॅस्टिक संकलन शेड,सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्थिरीकरण तळे,सार्वजनिक शोषखड्डे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र,कचरा विलगीकरण केंद्र,घरगुती व सार्वजनिकस्तरीय कचराकुंड्या घेणे,कचरा वर्गीकरण व परिसर सफाईसाठी उपयुक्त अवजारे व कर्मचारी यांच्यासाठी संरक्षण साहित्य घेणे,खत टाकी,गांडूळ खत प्रकल्प उभारणी,गोबरधन आणि प्लॅस्टिक कचरा प्रक्रिया देखभाल व दुरुस्ती, कंपोस्टिंगसाठी आवश्यक साहित्य घेणे,घनकचरा व प्लॅस्टिक कचरा वाहतुकीसाठी वाहनाची व्यवस्था करणे, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचे रेट्रोफिटिंग,कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करणे यासाठी असलेले मानधन व वेतन,तीन चाकी बॅटरी आधारित सायकल घेणे, या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
जागरूक कुटुंबांचा ” स्वच्छ माझे अंगण अभियान, ” मध्ये होणार सत्कार,
पालघर जिल्ह्यात ८९८ गावांमध्ये स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी ” स्वच्छ माझे अंगण,” अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान २६ जाने.पर्यंत राबवण्यात येणार आहे.या अभियानात स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुटुंबांचा ग्रामपंचायती मधय सन्मान करण्यात येणार असून, अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन,पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे व जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांनी केले आहे.जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय,शोषखड्डा अथवा परसबाग,कंपोस्ट खत खड्डा तसेच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या व निळ्या रंगाच्या दोन कचराकुंड्या असणाऱ्या कुटुंबांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनातील उत्कृष्ट कुटुंब म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.२१ ते २५ जाने.या कालावधीत ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य प्रत्यक्ष गृहभेटी देऊन या चार बाबी वापरात आहेत का याची माहिती घेणार आहेत.

