सुरेश काटे,तलासरी,
तलासरीतील रुग्णांची उपचारासाठी गुजरात राज्यात धाव,
आरोग्य विभागातील रिक्त पदे आणि आदिवासी भागात काम करण्याची उदासीनता, अशा दोन कारणामुळे तलासरी सारख्या आदिवासी भागात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहॆ.रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने नाईलाजास्तव गुजरात राज्यात जाऊन आदिवासी रुग्णांना महागडे उपचार करून घ्यावे लागत आहॆत.
तलासरी तालुक्यात शासानाच्या ग्रामीण रूग्णालयासह चार प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच २७ उपकेंद्रे आहेत,पण या आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची रीक्त पदे मोठया प्रमाणात आहेत.तसेच आदिवासी भागात काम करण्यास वैद्यकिय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उदासीनता असल्यामुळे,वैद्यकिय अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहायला तयार नसतात.एक डॉक्टर सतत तीन दिवस काम करून उर्वरित काळात घरी जात असल्याने आदिवासी रुग्णांना २४ तास सेवा मिळत नाही. तलासरी तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्यामुळे बोगस डॉक्टरांचे सुळसुळाट झाला आहे,पण त्याकडे अधिकारी व राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे,तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्र वसा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुत्रकार यासाठी नविन सुसज्ज इमारती बांधण्यात आल्या.पण त्या इमारतीत आरोग्य केंद्र स्थलांतरीत न झाल्यामुळे त्या इमारती धूळ खात पडल्या आहेत.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र सूत्रकारची इमारत बांधून तयार आहे,पण या आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने आरोग्य केंद्र अजुन जुन्या इमारतीमध्येच सुरू आहे.
तलासरी तालुक्यात अंगणवाडीमधील कुपोषित मुलांची संख्या कमी असली तरी कुपोषित बालके असणे ही चिंताजनक बाब आहे.या सॅम व मॅम बालके यांच्यावर अंगणवाडी सेविका तसेच कार्यकर्तीकडून विशेष लक्ष देण्यात येत असल्याने या बालकांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे, तालुक्यात २२८अंगणवाडी केंद्रे असून यामध्ये एकूण शून्य ते सहा वर्षाची १५ हजार ९५९ बालके आहेत. नोव्हें.२०२४ नुसार सॅम बालके – १ , मॅम बालके – ५६ आहेत,या बालकासाठी जिल्हा परिषद पालघर अंतर्गत ४७ अंगणवाडी केंद्रामध्ये ५६ मॅम बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र कार्यरत करण्यात आली. तसेच
लुपिन फाउंडेशनतर्फे मे २०२४ मधील ८० सॅम आणि मॅम च्या बालकांना त्यांच्या श्रेणीमध्ये सुधारणा होण्याच्या अनुषंगाने पोषण आहाराचे किट देण्यात आली.सॅम बालकांसाठी ९० दिवसांसाठी एनर्जी डेनसिटी न्यूट्रिशन फूड देण्यात येत आहे.तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देउन योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत असल्याने कुपोषित बालकांची संख्या कमी होत आहॆ.

