संजय नेवे,विक्रमगड,
विक्रमगड तालुक्यात २४ हजार मजुरांच्या हाताला गावातच काम,
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या माध्यमातून विविध कामांना सुरुवात झाली आहॆ.तालुक्यामध्ये २४ हजार २४५ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
तालुक्यात भातशेतीची कामे आटोपल्यानंतर भागातील आदिवासी मजूर मोठ्या संख्येने शहराकडे स्थलांतर होत असतात.परंतु गेल्या काही वर्षापासून रोजगार हमीच्या कामाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासीना कामे मिळू लागल्यामुळे या भागातील स्थलांतर कमी झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने मजुरांना १०० दिवस काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विविध शासकीय यंत्रणांची असल्याने आज पंचायत समिती स्तरावरील नाला खोलीकरण,गाय गोठा,घरकुल,पेवरब्लॉक,वृक्ष लागवड,रस्ते,अशी एकूण ५२३ कामे सुरू झाली असून त्यासाठी १४ हजार ६८२ मजुरांना काम मिळाले आहे. तर तहसील विभाग यंत्रणेच्या माध्यमातून कृषी फॉरेस्ट कामे तसेच सर्वाधिक मजूर संख्या असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग यांची १२९ कामे सुरू असून ९ हजार ५६३ मजुरांना काम उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून या माध्यमातून स्थानिकना दिलासा मिळाला आहॆ.
रोजगार हमी अंतर्गत जलसंधारणाच्या कामामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदाही झाला आहे.आज जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याची पातळी देखील वाढली आहॆ. याविषयी माहिती देताना तहसीलदार चारुशीला पवार म्हणाल्या,
विक्रमगड तालुक्यामध्ये रोजगार हमीची मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून या कामामुळे या मजुरांचे स्थलांतर कमी झाले आहॆ, असे सांगितले.मजुरानी मागणी केल्यास तात्काळ त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जात असल्याचे,त्यांनी पुढे सांगितले.

