रवि शानभाग,कर्जत
रायगड विशेष,
जनाची नाही तर मनाची लाज बाळगा -भरत गोगावले,
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ” जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी,” अशा परखड शब्दात राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी एका कार्यक्रमात त्यांना खडे बोल सुनावले.या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये रणकंदन सुरू होण्याची शक्यता आहे.
काल रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सीबीसी लॉन येथे कर्जत विधानसभा,शिवसेना,भाजप व रिपाई तर्फे नवनिर्वाचित मंत्री,खासदार,आमदार,
यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता,त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास सार्व. आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर,भरत गोगावले,खा.धैर्यशील पाटील,पेणचे आ.रवि पाटील,खा.श्रीरंग बारणे,माजी आ.महेंद्र थोरवे व सुरेश लाड इ.मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांना मात्र आमंत्रण देण्यात आले नव्हते.यावेळी प्रत्येक वक्त्याने जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा आपल्या भाषणात घेतला.भरत गोगावले यांनी मात्र आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कारभारावर चांगलेच तोंडसुख घेतले.ते पुढे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला नुकताच कानमंत्र दिला,त्यानुसार आम्ही वागत आलो.आमची नियत व निती चांगली होती,म्हणून रायगडमध्ये आपला विजय झाला,अन्यथा काय झाले असते,याचा विचार करा,अशी सडकून टीका केली.या सर्व घडामोडीवरून जिल्ह्याचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.तटकरे विरुद्ध महायुतीमधील रिपाई,भाजप,शिवसेना असे चित्र पाहायला मिळत आहे.

