रुपेश संख्ये,पालघर,
रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा – आ.राजेंद्र गावित,
देवमोगरा फाउंडेशन ट्रस्ट संचलित सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स,पालघर यांच्या प्रथम वर्षाच्या जी.एन.एम.नर्सिंग विद्यार्थ्यांच्या दीपप्रज्वलन व शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजेंद्र गावित उपस्थित होते.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात नर्सिंग व्यवसायाचे महत्त्व विशद केले.
यावेळी आ.गावित म्हणाले की, ” नर्सिंग हे समाजसेवेतील एक महत्त्वाचे कार्य आहे.या व्यवसायात ” रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा,” हे व्रत ठेवून काम करणे,आवश्यक असते . नर्सिंग व्यवसाय हा मानवतेची सेवा करणारा आणि कौशल्याला अधोरेखित करणारा आहे.” फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याचा संदर्भ देत आ.गावित म्हणाले, ” परिचारिका ही रुग्णांसाठी केवळ सिस्टर नसून आईसमान असते,जी त्यांची काळजी घेते व त्यांना सावरण्यास मदत करते.” रुग्णाच्या प्रकृतीसाठी ७०-८० % सेवा नर्सिंग व पॅरामेडिकल स्टाफकडून होते,त्यामुळे ते खरे हिरो आहेत.” विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आ.गावित म्हणाले की, ” तुमच्याकडे असलेली समर्पणवृत्ती, मेहनत,दृढनिश्चय आणि कौशल्य बघून मला अभिमान वाटतो.तुम्ही तंत्रज्ञानाच्या बदलांबाबत सतर्क राहा व स्वतःला सतत सुधारत राहा.”
नर्सिंग स्टाफ रुग्णाच्या अत्यंत जवळची व्यक्ती असते, त्यामुळे नर्सिंग क्षेत्राचे काम हे खूप जबाबदारीचे आहॆ.सध्या जगभरात प्रत्येक रुग्णालयात नर्सिंग स्टाफचा तुटवडा भासत आहे,यासाठी देवमोगरा फाउंडेशन ट्रस्ट संचलित सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स पालघर,यांच्याद्वारे घडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देशात व परदेशात भासत असलेल्या नर्सेसच्या तुटवड्यावर परिणामकारक ठरतील व नुसते संस्था पालघर किंवा राज्याचे नव्हे तर संपूर्ण भारताचे नाव जगभरात उज्वल करतील,असे प्रतिपादन आ.राजेंद्र गावित यांनी याप्रसंगी केले.
नर्सिंग हे सेवाभावी क्षेत्र आहे व सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात नर्सिंग क्षेत्रात उत्तम संधी निर्माण होणार आहेत. नर्सिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संवेदनशील, दक्षशिस्तप्रिय व समाजसेवा जोपासणे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन बोईसर आ.विलास तरे यांनी केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या अभ्यासेतर उपक्रम आणि महाविद्यालयाचा भविष्यातील दृष्टीकोन योजना याबद्दल प्राचार्या अक्षता राऊत यांनी आपला अहवाल सादर केला.
कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाप्रसे भानुदास पालवे,पोलीस अधीक्षक भापोसे बाळासाहेब पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी,माजी नगराध्यक्ष उज्वला काळे,शिवसेना प्रवक्ते केदार काळे आणि संस्थेचे अध्यक्ष शांताराम वळवी
सचिव जतिन संखे,उपाध्यक्ष रुपाली गावित,सदस्य रोहित गावित आदींचा समावेश होता.कार्यक्रमाने नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून, सामाजिक सेवेचा वसा घेऊन ते समाजासाठी उत्तम योगदान देतील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

