संजय लांडगे,वाडा,
डोंगस्तेच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश;
वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्ते हद्दीमध्ये दगडखदान,क्रशर व्यवसाय सुरू असून,सदर व्यवसायिकांकडून सातत्याने दिवसरात्र बोअर ब्लास्टींग करण्यात येत असते.त्यामुळे येथील घरांच्या भिंतींना तडे जावुन घरे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी धर्मवीर विचार मंचच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.पण प्रशासनाने याची दाखल घेतली नाही म्हणून दोन दिवसापूर्वी धर्मवीर विचार मंच व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला होता,पण त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवले होते.दरम्यान अध्यक्ष मिलिंद पष्टे यानी सलग तीन दिवस अन्नत्यागही केला. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून आज तहसीलदार भाऊसाहेब अंधेरे यांनी दगडखान मालकाना पाचारण करून चर्चा केली. यावेळी गुरुकृपा इंटरप्रायजेस यांनी ब्लास्टिंगचा परवाना नसल्याचे कबुल करून परवाना मिळल्यानंतर काम सुरु करू,तसेच सध्या खदान बंद आहॆ,असे लिहून दिले.
तहसीलदार समोर लेखी आश्वासन दिल्यानंतर डोंगस्थे ग्रामस्थ व धर्मवीर विचार मंचचे अध्यक्ष पष्टे यांनी लिंबू पाणी पिऊन उपोषण मागे घेतले.
या आंदोलनात ग्रामस्थांसह धर्मवीर विचार मंचचे सचिव अक्षय पष्टे,सहसचिव राहुल पाचलकर,खजिनदार सागर पाटील,सल्लागार संदीप पाटील,सदस्य संदेश पाटील, देवदत्त शेलार,रितेश राऊत, विकास गिंभल यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे मत पष्टे यांनी व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

