नदीम शेख,पालघर,
चिंचणी बारीवाडा येथील पाणीप्रश्नावर तातडीने उपाययोजना,
चिंचणी – बारीवाडा येथील पाणीप्रश्न गंभीर बनल्यामुळे आ.गावित यांनी गावकऱ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहुन चर्चा केली. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर आ.गावित यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. पाणीपुरवठा यंत्रणेतील अडचणी,नळजोडण्यातील त्रुटी आणि जलवाहिन्याच्या दुरुस्तीची आवश्यकता याबाबत अधिकाऱ्यांशी तातडीने संवाद साधला. गावकऱ्यांना जलस्रोत लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी अधिकारी व स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले.याविषयी आ.राजेंद्र गावित म्हणाले,पाणी हा मूलभूत हक्क असून, प्रत्येकाला तो मिळायला हवा. या समस्येचा त्वरित तोडगा काढण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल.प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना त्यांनी कडक सूचना दिल्या. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. गावकऱ्यांच्या सहभागातूनच या प्रश्नाला कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे सांगत त्यांनी सर्वांना एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधीक्षक अभियंता तन्मय कांबळे, कार्यकारी अभियंता राजेश पाधी व चिंचणी बारीवाडा गावातील गावकरी उपस्थित होते.

