वसंत भोईर,वाडा,
स्थानिक पेंढा व्यापारी संगनमताने करतात शेतकऱ्यांची लूट,
वाडा तालुक्यात विभागवार पेंढा खरेदी केंद्राची गरज,
तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा पावसाच्या भितीने भात कापणीसोबत घाईघाईने झोडणीलाही सुरुवात केली आहे.झोडणी करून शेतात ठेवलेल्या पेंढ्याला चांगला भाव मिळेल,या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेंढा व्यवस्थित रचून ठेवला आहे.मात्र पेंढा खरेदी करणारे स्थानिक व्यापारी लबाडीने भाव कमी करण्यासाठी शकल लढवत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत आपला पेंढा विकावा लागत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील स्थानिक पेंढा खरेदी करणारे छोटे-मोठे व्यापारी संगनमत करून हेतुपूर्वक काही दिवस पेंढा खरेदीकडे पाठ फिरवत आहेत.तसेच मुंबई व वसई शेजारील पट्ट्यात म्हशींच्या तबेल्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत.तेथे पेंढ्याला मोठ्या प्रमाणात मागणी असून तेथून कुणी व्यापारी थेट पेंढा खरेदी करण्यासाठी येत असेल,तर त्याला हे स्थानिक व्यापारी मज्जाव करत असतात.त्याच्याशी हुज्जत घालून त्याला परत पाठवण्याचे प्रकार करण्यात येत असतात.काही दिवसांनंतर अचानक पेंढा खरेदी करण्यास हे स्थानिक छोटे-मोठे चालबाज व्यापारी संगनमत करून शेतकऱ्यांच्या शेतावर जातात,तर त्यांच्याकडून यंदा पेंढा मुबलक प्रमाणात आहे,पुढे भाव कमी होणार
आहे.पावसाचा काही नेम नाही,पाऊस पडला तर तुमचा पेंढा वाया जाईल,अशी अनेक कारणेव्यापाऱ्यांकडून सांगण्यात येतात.त्यामुळे आधीच अर्थिक अडचणीत असलेला शेतकरी मिळेल,त्या भावात पेंढा विक्री करीत आहेत .
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा उठवून स्थानिक व्यापारी संगनमत करून शेतकऱ्यांकडून आगदी कमी भावात पेंढा खरेदी करून त्यांची लूट करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.ही लूट थांबण्यासाठी व पेंढ्याला योग्य हमीभाव मिळावा,यासाठी तालुक्यात विभागवार पेंढा खरेदी केंद्र सरकारकडून उभारण्यात यावेत.तसेच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांवर भर द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

