दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कराड याचे स्वतःहून हजर होणे,सरकार व पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली…
अखेर,वाल्मिक कराड स्वतःहून हजर झाला.त्याने स्वतः हजर होऊन पोलीस,राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व फडणवीसांच्या गृहखात्याच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहेत.सरकार व गृहविभाग कसे नसावे,हे या घटनेने दाखवून दिले आहे.तब्बल २२ दिवसांनी वाल्मिक कराड स्वतःहून हजर झाल्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर अज्ञात शक्तीचा दबाव होता,हे स्पष्ट झाले आहे.ज्या महाराष्ट्र पोलिसांची देशभरात ख्याती होती,ती या कराडाने अक्षरश: धुळीस मिळवली.
एकेकाळी गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले विनायक वाकटकर,ज्युलिओ रिबेरो,विजय साळसकर,हेमंत केरकर,अशोक कामटे यांनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्र पोलिसांचे नाव शिखरावर नेऊन ठेवले होते,आज त्या महाराष्ट्र पोलिसांना या कराड महाशयाने तोंड दाखवायला जागा ठेवली नाही.हे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे,त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन पदाचा राजीनामा द्यायला हवा.पण तसे होणार नाही कारण आपल्या मुख्यमंत्र्यांची कातडी आता गेंड्याची बनली आहे.संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर गेले बावीस दिवस कराड पोलिसांना सापडत नव्हता.त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे भासवण्यात येत होते.पण हा कराड आपल्या अंगरक्षकासह तीर्थ पर्यटन करताना उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाला.याप्रकरणी पोलीस अधीक्षकपदाची नव्याने सूत्रे हाती घेतलेले नवनीत कवात यांनी बीडमध्ये काय दिवे लावले,ते देवजाणे ? त्यांनी केवळ या प्रकरणाशी संबधित लोकांना चौकशीसाठी समन्स बजावण्याचे काम केले.तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ हाती फायली घेऊन फिरण्याचे काम केले.तर दुसरीकडे हा कराड मात्र ऐटीत भटकंती करत फिरत होता.या कराडचे स्वतःहून सीआयडी कार्यालयात हजर होणे,हा प्रकार म्हणजे आपली पोलीस यंत्रणा व गृहखात्याची विश्वासार्हता पार लयाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांना जरा जरी नैतिकतेची चाड असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा.खाती वाटप करताना एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये या गृहखात्यावरून जोरदार रस्सीखेच झाली होती.गृहखात्यासाठी दोघांचा एवढा अट्टाहास का होता,ते याप्रकरणामुळे उमगू लागले आहे.आपल्या लोकांना वाचवण्यासाठी हे खाते नेत्यांना हवे असते.या प्रकरणामुळे ते सिद्ध झाले आहे.

