दीपक मोहिते,
बांगला देशात हिंदूनंतर ख्रिस्ती समुदाय रडारवर,
बांगला देशात हिंदूनंतर आता ख्रिस्ती समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे.ख्रिस्ती समुदायाच्या वस्तीवर समाजकंटकाकडून सतत हल्ले करण्यात येत आहेत. बांगला देशात सध्या जे काही चालले आहे,त्यामध्ये अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएचा हात आहे.दक्षिण आशियामध्ये भारत बलाढ्य राष्ट्र होता कामा नये,यासाठी अमेरिका,चीन व पाकिस्तान हे तिघे प्रयत्नशील आहेत.हसीना शेख यांचे सरकार खाली खेचण्यात अमेरिकेने महत्वाची भूमिका बजावली होती.बांगला देशाचे सल्लागार युनूस मोहंमद यांनी बांगला देशाच्या लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराला पाचारण केले आहे.दक्षिण आशिया अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असून, त्यामध्ये अमेरिका महत्वाची भूमिका पार पाडत आहे. म्यानमार व नेपाळ या दोन देशात चीनचा ड्रॅगन हातपाय पसरू लागला आहे.तर श्रीलंकेला चीनने आर्थिक मदत देत,त्यांची अर्थव्यवस्था पार खिळखीळी केली आहे. या सर्व घडामोडीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.अशावेळी केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेणे, अत्यंत धोकादायक ठरू शकते.
काही महिन्यापूर्वी हसीना शेख यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर बांगला देशात अल्पसंख्यांक समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे.हल्लेखोरानी प्रथम हिंदुची मंदिरे लक्ष्य केली. त्यानंतर आता ख्रिस्ती समुदायाच्या वसाहतीवर हल्ले सुरु झाले आहेत.
बंडरबन जिल्ह्यातील लामा भागात २५ डिसें.रोजी सकाळी गावकरी ख्रिसमसच्या प्रार्थनेसाठी शेजारच्या गावात गेले होते,त्यावेळी कट्टरपंथी्यांकडून हा हल्ला झाला.हा हल्ला ख्रिश्चन समुदायावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, टोंगजिरी भागातील न्यू बेताचारा पारा गावातील लोक चर्च नसल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी सण साजरा करण्यासाठी गेले होते. त्यानंतर हल्लेखोरांनी गावावर हल्ला केला आणि १७ घरे पूर्णपणे जाळली.या हल्ल्यात १५ लाखांहून अधिक रु.चे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
न्यू बेताचारा पारा गावातील लोकांनी ढाका ट्रिब्यूनला सांगितले की,गेल्या महिन्यात १७ नोव्हें.रोजी समाजकंटकानी त्यांना गाव सोडण्याची धमकी दिली होती.यावर गंगा मणि त्रिपुरा नावाच्या व्यक्तीने लामा पोलीस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
मात्र,पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.आता घरे जळून खाक झाल्यानंतर पीडित कुटुंबाला मोकळ्या आकाशाखाली जगावे लागत आहे.गंगा मणि त्रिपुरा म्हणाल्या,आमची घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आता आमच्याकडे काहीच उरलेले नाही.
त्रिपुरा समाजाचे लोक दावा करतात,की ते अनेक पिढ्यांपासून या ठिकाणी राहतात.मात्र अलीकडच्या काळात त्यांना तेथून हटवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.काही स्थानिक लोकांचा आरोप आहे की सरकारने ही जमीन पोलिस अधिकारी आणि माजी आयजीपी बेनझीर अहमद यांना भाड्याने दिली आहे.
बांगला देशात सध्या जे काही चाललं आहे,त्यावर केंद्र सरकारने अद्याप कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे बांगला देशातील हिंदू व ख्रिस्ती या दोन्ही अल्पसंख्यांक समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

