नवीन पाटील,सफाळे,
नववर्षाच्या स्वागताचा होणार जल्लोष,रिसॉर्ट्स हाऊसफुल्ल,
पालघर जिल्हातील किनारपट्टीचा भाग हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, केळवे,शिरगाव,बोर्डी,डहाणू नरपड अर्नाळा येथील समुद्रकिनारा तसेच माकूणसार,दातीवरे,दांडा खटाळी,मनोर व विक्रमगड तालुक्यातील रिसॉर्टवर पर्यटकांची गर्दी होऊ लागल्याने गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पर्यटकांचा ओघ या पर्यटनस्थळाकडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे रस्ते मार्गाने पर्यटक येण्यास धजावत नसत.पावसाळ्यामध्ये साधारण दोन अडीच तासाच्या प्रवासासाठी चार ते पाच तास लागत होते.त्यामुळे पर्यटकांची संख्या पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपासून रोडावली होती.मात्र आता या मार्गात सुधारणा झाल्यामुळे पर्यटक पुन्हा या येथे वळायला लागले आहेत.
मुंबई,वलसाड,वापी व नाशिक भागातील पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात येत असतात.गेल्या वर्षापेक्षा यंदा या परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी हॉटेलची बुकिंग आगाऊ केली असल्यामुळे २५ ते ३१ डिसें.पर्यंत इथले हॉटेल्स व रिसॉर्ट हे फुल होणार आहेत.
केळवे निसर्गसुंदर समुद्रकिनारा केळी पानवेली आंबा,फणस,नारळ व पोफळीच्या बागा सागर किनाऱ्यावर देखणी सुरुची बाग,समुद्रातील पाणकोट किल्ला भुईकोट किल्ला इतिहासाची साक्ष देत आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेले केळवे गाव आता एक उत्तम पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे शितलादेवी कालिकादेवी राम मंदिर,अशी देवस्थाने आहेत.त्यामुळे पर्यटकांची ओढ केळव्याकडे अधिक आहे.
केळवे,बोर्डी,नरपड येथे वाडवळी पद्धतीचे जेवण व अळूवडी बोंबलाची पोत्यांडी, तांदळाची भाकरी,उकडहंडी, वालपापडीची पोपटी,चिकन पोपटी इ.वेगळ्या प्रकारचे पदार्थ पर्यटकांच्या मागणीप्रमाणे तयार करून दिले जातात,त्यासाठी पर्यटक खास येत असतात नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी काही रिसॉर्टमालकांनी डीजेची सोय केली असून विविध पदार्थ पर्यटकांना देण्यात येणार आहेत,असे रिसॉर्टमालकाकडून सांगण्यात आले या पदार्थामुळेच यावर्षी सर्व रिसॉर्ट हाउसफुल्ल झाले आहेत.
सध्या महागाईमुळे वाढलेले मजुरीचे दर व इतर खर्च, यामुळे गेल्या वर्षापेक्षा वीस ते ३० % दर वाढले आहेत.एका दिवसासाठी हजार ते दीड हजार व चांगल्या रीसॉर्टमध्ये २००० पासून साडेतीन हजारापर्यंत यात राहणे व शाकाहारी या मांसाहारी जेवण व नाश्ता दिले जाते. पर्यटकांच्या मागणीप्रमाणे विविध पदार्थ देण्यात येत असतात.त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची चांगलीच चंगळ आहे.
कोट…
गेल्या वर्षापेक्षा यावर्षी २५ ते ३१ डिसें.पर्यंत हॉटेलचे बुकिंग ७० टक्के पर्यंत झाले आहे पुढील एक ते दोन दिवसात शंभर टक्के बुकिंग होईल ही अपेक्षा आहे.
– आशिष पाटील, व्यवसायीक.

