दीपक मोहिते,
तुंगारेश्वर अभयारण्यात भ्रष्टाचाराचे जंगलराज…
नरभक्षक पकडण्यासाठी जाळे लावणारे अधिकारीच भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकत असल्यामुळे तुंगारेश्वर अभयारण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
तुंगारेश्वर अभयारण्यातील भ्रष्टाचाराचा अजून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मांडवी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल संदीप चौरे याला काल १० लाख रु.ची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते.खाजगी इसमाच्या मदतीने वनजमिनीवरील बेकायदेशीर ताबा परत मिळवून देण्यासाठी ही लाच घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
वन विभागातील अधिकाऱ्यांवर एकामागून एक होणाऱ्या कारवायांमुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील भ्रष्टाचाराचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.काही महिन्यांपूर्वी गोखिवरे वन परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दिलीप तोंडे यालाही लाचलुचपत विभागाने अटक केली होती.तसेच काही दिवसांपूर्वी आणखी एका वन कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती.या घटनांमुळे तुंगारेश्वर अभयारण्यात वनजमिनींच्या संरक्षणाऐवजी अधिकाऱ्यांनी भूमाफियांशी हातमिळवणी करून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू केल्याचा संशय बळावला आहे.तुंगारेश्वर अभयारण्यात परप्रांतीय भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे. अनधिकृत बांधकामांवर केवळ नोटिसांचा देखावा करून लाखो रु.ची वसुली करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वनजमिनींचे संरक्षक म्हणून कार्यरत असलेले अधिकारीच भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकत असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे.
लाचलुचपत विभागाने चौकशीत चौरेच्या घरातून तब्बल ५७ तोळे सोने आणि १ कोटी ३१ लाख रु.ची रोकड जप्त केली असल्याचे वृत्त आहे.एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरी एवढी संपत्ती कुठून आली ? याचा तपास सुरू आहे. वनक्षेत्रपालाच्या ताब्यात आढळलेल्या या संपत्तीने तुंगारेश्वर अभयारण्यातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार किती खोलवर आहे,याची झलक पाहायला मिळाली आहे. यातील ५७ तोळे सोने हे त्यांच्या पत्नीचे स्त्रीधन असून १ कोटी ३१ लाख ९६ हजार रू.ची रोख रक्कम त्यांच्या भाडेतत्वावरील राहत्या घरी मीरारोड येथील पूनम गार्डन आसोपालव सोसायटीच्या डी विंगमधील रूम क्र.६०१ व ६०२ मधून जप्त करण्यात आली आहे.त्यासह घरातून एकूण १ कोटी ३७ लाख ५१ हजार ५०० रू.चा मुद्देमाल लाचलूचपत विभागाने हस्तगत केला आहे.आढळून आलेल्या मोठ्या प्रमाणावरील घबाडानंतर तुंगारेश्वर वन अभयारण्यातील वाढता भ्रष्टाचार व हपापलेले अधिकारी,असे संतापजनक चित्र समोर आले आहे.सदर घराची झाडाझडती अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे यांनी केली.
तुंगारेश्वर अभयारण्यात वाढत्या घुसखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर वनविभागाकडून काही ठोस कारवाई झाली नाही,त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.वनजमिनींचे क्षेत्र कमी होणे,अनधिकृत बांधकामांची भर पडणे,आणि वसुलीच्या घटना या अभयारण्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करत आहेत.
नरभक्षक पकडण्यासाठी जाळे लावणारे अधिकारीच भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकत असल्यामुळे तुंगारेश्वर अभयारण्याचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे.प्रशासन आणि संबंधित खात्यांनी या प्रकरणांवर कडक कारवाई करून अभयारण्याचे संवर्धन करण्याची गरज आहे.

