वसंत भोईर,
वज्रेश्वरीचे मूळ स्थान भागीरथी माता ; निसर्गरम्य पण दुर्लक्षित
वाडा तालुक्यातील गुंजकाठी येथे पांडवकालीन अधि प्राचीन भागीरथी मातेचे मंदिर आहे.निसर्गरम्य, डोंगराळ भागात वसलेले हे मंदिर सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे.
तालुक्यातील गुंज काटी येथील मंदाकिनी पर्वतावर भगवान परशुराम व त्याची माता भागीरथी आज ही तपश्चर्या करीत आहेत.अशी भाविकांची समजूत आहे. पांडव अज्ञातवासात असताना ते येथे आले होते.त्यांनी देवतांसाठी मंदिर उभे करावे या हेतूने मंदिर बांधावयास घेतले.उंदीराची मूर्ती पूर्ण होण्याआधी कोंबडा आरवल्याने ( पहाट ) झाल्यामुळे त्यांनी बांधकाम थांबवले.अपूर्ण मंदिराचे अवशेष आजही गुंजकाटी येथे आढळतात.त्याचप्रमाणे येथे शिवमंदिराचे अवशेष, देवतांच्या पालना घराचे अवशेष आहेत.मंदिर पूर्ण न झाल्याने तेथील देवता आश्रयासाठी भागीरथी येथील काटी या गावी गेली. महालक्ष्मी ही महालक्ष्मी येथे गेली तर,कालिका,रेणुका व वज्रेश्वरी या तानसा नदी जवळ असलेल्या वज्रेश्वरी येथे गेल्या. चिमाजी आप्पा यांनी वसई किल्ला सर केल्यानंतर या मंदिराचा जिर्णोद्धार झाला.या दोन्ही ठिकाणी दरवर्षी मोठ्या यात्रा भरतात.या सर्वांमध्ये परशुराम लहान असल्याने ते मंदाकिनी पर्वतावर तपश्चर्या करीत आहेत,अशी आख्यायिका आहे.
काटी येथे भागीरथी मातेच्या मंदिराजवळ पाण्याचे कुंड असून त्याला तटासारख्या भिंती आहेत.येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे.ते एकाच दगडाचे बनवले असून त्याचा आकार सुबक आहे. त्याला तीन प्रवेशद्वार आहेत. गाभारा वेगळा असून मुख्य प्रवेशद्वार सुंदर कोरीव कामाने मढवण्यात आले आहे. मंदिराच्या मागील भागात वाघाची गुहा आहे.येथे वाघाचा वावर असून गेल्या काही वर्षांपूर्वी येथील एका चार वर्षाच्या मुलीला वाघाने पळवून याच गुहेमध्ये नेल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे. कारण आजपर्यंत मुलीचा शोधच लागला नाही.त्यामुळे काही काळ ग्रामस्थांनी भयभीत होऊन आपली घरे सोडली होती.
हे मंदिर निसर्गरम्य डोंगरात आहे.ही वास्तू सध्या वज्रेश्वरी येथील योगिनी देवी ट्रस्टच्या ताब्यात असून ट्रस्ट कडून कुठल्याही प्रकारची देखभाल होत नाही. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात हा भाग गेल्याने निर्णय लवकर होईल,असे वाटत नसल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन पवार यांनी दिली.

