वाडा प्रतिनिधी,
वाडा येथे शिंदीचा पाडा रस्त्याची दुरावस्था,
तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायत हद्दीत शिंदीचा पाडा या गावाकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून,संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर,भाविकांची मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून ये-जा सुरू आहे. मात्र खराब रस्त्यामुळे हा प्रवास त्रासदायक ठरत आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही शिंदीचा पाडा येथे देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे.परिसरातील तसेच इतर गावांतील असंख्य भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.परंतु, रस्त्याची दुरवस्था ही त्यांच्यासाठी मनस्ताप ठरली आहे.वाहनचालकांना व पादचाऱ्यांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ” गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अशीच आहे. पावसाळ्यात तर रस्त्यावर पाणी साचून चिखल होत असतो आणि खड्डे पूर्णपणे भरून जातात.त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.”
नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.ग्रामपंचायत स्तरावर देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता,प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत प्रवास व्हावा,यासाठी उपाययोजना करावी,अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविक करत आहेत.

