वसंत भोईर,वाडा,
गणरायाच्या मार्गात खड्ड्यांचे विघ्न
आराध्य दैवत गणरायाचे आगमन एक दिवसावर येऊन ठेपले आहे.शिवाय यावर्षी गणेश उत्सवाला महाराष्ट्र उत्सवाचा अर्थात राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे.त्यानुसार गणेश भक्तांकडून आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, हा विघ्नहर्ता ज्या मार्गावरून घरी येणार आहे, किंवा त्याचे भक्त ज्या मार्गावरून ये-जा करणार आहेत.त्या मार्गावर सर्वत्र खड्डे पडल्यामुळे गणरायाच्या मार्गातील विघ्न कायम आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
वाडा -भिवंडी- मनोर या मुख्य रस्त्यांसह तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची ही प्रचंड दुरावस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे,हे समजणे मुश्किल होऊन बसले आहे.मुख्य रस्त्यावर गुडघाभर मोठ-मोठे खड्डे पडल्याने प्रचंड त्रास वाहनचालकांसह प्रवाशांना होत आहे.रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे वाहनांचे प्रचंड नुकसान होत असून चालकांनाही आजार जडले आहेत.रस्त्याच्या या अवस्थेकडे ना प्रशासनाचे लक्ष,ना लोकप्रतिनिधींचे, नागरिकांनी करायचे तरी यायचे काय असा सवाल विचारण्यात येत आहे.
कोट्यवधी रु.खर्च होऊनही ही दुरावस्था कायम आहे. गणेशोत्सव आला की, खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित होतो. त्यानंतर कुणीही खड्ड्यांचा विषय उचलून धरत नाही.त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.गणेशोत्सव काळात खड्डे भरले जातील,अशी आश्वासने दरवर्षी शासन देत असते, मात्र खड्ड्यातूनच बाप्पाचे आगमन होणार आहे हे मात्र निश्चित…

