जव्हार प्रतिनिधी,
मुसळधार पावसामुळे पिंपळशेत-खरोंडा पूल गेला वाहून,
जव्हार तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील अरुंद पुलांवर पाणी आल्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले.
या नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले.पिंपळशेत खरोंडा परिसरातील खरोंडा, माडवीहिरा,हुंबरण या गावांना जोडणारा पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. परिणामी या मार्गाने येजा करणारे शालेय विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांचे हाल झाले. हेदीचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीकामामध्ये अडचणी येत आहेत.ग्रामस्थांनी आठवण करून दिली की, सन २०२२-२३ या वर्षी २७ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे याच भागातील रस्ता,पूल व मोऱ्या वाहून गेल्या होत्या.मात्र त्या वेळेपासून आजपर्यंत शासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी दुरुस्तीची कामे सुरू केलेली नाहीत.अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.वारंवार पत्रव्यवहार करूनही शासन व प्रशासनाचे लक्ष देत नसल्यामुळे ग्रामस्थ आता संघर्षाच्या भूमिकेत आले आहेत.येणाऱ्या काळात सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार येथे तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती पिंपळशेत खरोंडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश लक्ष्मण जाधव यांनी दिली.आंदोलनाच्या काळात या भागातील गरोदर माता, शालेय विद्यार्थी, तसेच सर्व ग्रामस्थ बिऱ्हाड घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मुक्काम ठोकतील.जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत,तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,असा इशारा ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.या संघर्षामुळे शासन व संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून पूल व रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे,अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याची शक्यता आहे.

