दीपक मोहिते,
मुसळधार पावसामुळे वसई/विरार परिसर जलमय,
कालपासून वसई – विरार भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील तीन शहरे व अनेक गावे जलमय झाली आहेत.अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे आज दिवसभर वाहने जपून चालवावी लागत होती.
काल रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे वसई तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.मात्र आजच्या पावसाने गोविंदाचा आनंद मात्र द्विगुणित झाला होता.विरार पश्चिम,नालासोपारा पूर्व व वसई याभागात गुडघाभर पाणी साचले होते.त्यामुळे वाहने संथगतीने येजा करत होती.दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होईल,असा इशारा दिला होता.त्यानुसार काल रात्री व आज दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली.पावसासोबत ढगांचा गडगडाट व सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे अनेक नागरी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.अद्याप अनेक भागात पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांना सध्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.महानगरपालिकेच्या अनेक क्षेत्रात पाणी साचले पण प्रशासनाचा आपत्ती निवारण विभाग कुठेही पाहायला मिळाला नाही.त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

