सचिन जोशी,वसई
वसई विरार शहरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा,
आज वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे “ स्वातंत्र्य दिन,” मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांतर्फे राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत,ध्वजगीत व राज्यगीत म्हणण्यात आले.ध्वजारोहण कार्यक्रमानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून तसेच दीपप्रज्वलन करून वंदन करण्यात आले.
महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास आ.राजन नाईक,माजी आ.हितेंद्र ठाकूर,माजी आ.क्षितीज ठाकूर,माजी महापौर राजीव पाटील, अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत,उपायुक्त तसेच माजी सभापती,माजी नगरसेवक, माजी नगरसेविका,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पोलीस विभागातील कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी,पत्रकार,नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.
हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत महानगरपालिका मुख्यालय व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका मुख्यालय ते म्हाडा मैदानापर्यंत ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या “ स्वच्छता रॅली,” तसेच “ वृक्षदिंडी,” मध्ये आ.राजन नाईक व आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवर,मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच शालेय विद्यार्थी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी काही विद्यार्थ्यानी देशवीरांची वेशभूषा केली होती.रॅलीत सहभागी झालेल्यांनी हातात तिरंगा ध्वज,तुळशी रोपे, पर्यावरण विषयक घोषणांचे फलक इ.घेऊन विविध देशभक्तीपर घोषणा दिल्या व यामुळे देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.त्याचबरोबर स्वच्छतेविषयीची जनजागृतीही यावेळी करण्यात आली. महानगरपालिकेमार्फत देशभक्तीपर गाण्यांसोबतच महानगरपालिकेने महानगरपालिका क्षेत्रात केलेल्या व करीत असलेल्या विविध उपक्रमांची यामध्ये दैनंदिन स्वच्छता,पर्यावरण पूरक गणेशोत्सव इ.ची व्हिडीओ स्क्रीनद्वारे माहिती सांगणारी एक व्हॅन रॅली सोबत ठेवण्यात आली होती. अतिशय शिस्तबद्ध व देशभक्तीपर वातवरण निर्मिती करीत “ स्वच्छता रॅली,” तसेच “ वृक्षदिंडी,” म्हाडा मैदान, विरार पश्चिम येथे संपन्न झाली. तदनंतर म्हाडा मैदान येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्येही ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग समिती ‘एच’ नवघर-माणिकपूर येथे तिरंगा रॅलीचे व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त दिंडी स्वरूपात मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा रॅली व मिरवणुकीत आ.स्नेहा दुबे-पंडित,माजी महापौर नारायण मानकर व इतर मान्यवर सहभागी झाले होते.त्याचप्रमाणे प्रभाग समिती ‘ए’ बोळींज मार्फत बाईक रॅली, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त दिंडी स्वरूपात मिरवणूकीचे तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग समिती ‘बी’ नालासोपारा मार्फत बाईक रॅली, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त दिंडी स्वरूपात मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार मध्ये ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तिरंगा रॅलीचे व दिंडी स्वरूपात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभाग समिती ‘डी’ आचोळे मार्फत तिरंगा रॅली काढण्यात आली असून कार्यालयाजवळ सायंकाळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त दिंडी स्वरूपात मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी म्हणजेच मुख्य रस्ते, उद्याने, तलाव, चौक, मनपा कार्यालये इ.महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या तिरंगा थीम रोषणाईने सर्व परिसर तिरंग्याने उजळून निघाला होता.महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या तिरंगा सेल्फी पॉईंटलाही नागरिकांमार्फत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीच महानगरपालिकेमार्फत “तिरंगा दौड”, “तिरंगा बाईक रॅली”, तिरंगा रॅली सारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच नागरिकांना तिरंगा ध्वज, राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनासंबंधीच्या वस्तू उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेतर्फे महिला बचत गटांमार्फत बाजारपेठा सुरु करण्यात आल्या होत्या. महानगरपालिकेच्या या उपक्रमांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

