जव्हार,प्रतिनिधी
जव्हारमध्ये ” बालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा,” कार्यशाळा संपन्न.
आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जव्हार आणि इंडियन सोशल सर्व्हिस युनिट ऑफ एज्युकेशन ( नागपूर ) यांच्या संयुक्त विद्यमाने ” बाल संरक्षण प्रणाली, ” स्थापित करणे,असा डोळ्यासमोर ठेवुन नुकतीच जव्हार येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील ३० शासकीय आदिवासी आश्रमशाळांच्या मुख्याध्यापक सहभागी झाले होते.कार्यशाळेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर ( भा.प्र.से ) यांनी केले. सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सुभाष परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ शेवाळे आणि ‘ईश्यू’ संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक व संचालक राजीव थोरात यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रार्थना गीताने कार्यशाळेला सुरुवात झाली.‘ईश्यू’ या संस्थेचे प्रमुख राजीव थोरात यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या सहयोगाने आणि प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळेत ” बाल संरक्षण प्रणाली,” निर्माण करण्यासाठी ” हा उपक्रम राबवण्यात आला. प्रकल्पातील सर्व ३० शाळा बालस्नेही व्हाव्यात आणि बालकांचे हित साधले जावे हा यामागचा मुख्य उद्देश होता.संस्था बालहक्क आणि बाल संरक्षणासाठी समर्पित असून पालघर जिल्ह्यात या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे.या उपक्रमातून आश्रमशाळा व वसतिगृहांमधील हजारो मुलांच्या वर्तन व व्यवहारात सकारात्मक बदल घडून येणार आहे. बालक–पालक–शासकीय यंत्रणा यांच्या संयुक्त सहभागातून बाल संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे.त्यामुळे मुलांना त्यांचे हक्क मिळतील आणि खऱ्या अर्थाने त्यांचे संरक्षण व सर्वांगीण विकास होईल,असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.यावेळी ‘ईश्यू’ या संस्थेने मुख्याध्यापकांना बाल संरक्षणाच्या आवश्यक संकल्पना व कायद्यांवर प्रशिक्षण दिले. प्रकल्प व्यवस्थापक राजीव थोरात यांनी प्रकल्पाची उद्दिष्टे, स्वरूप,विषय आणि कृती आराखडा सादर केला.समारोप सत्रात सुभाष परदेशी,तिरुपती सांगवीकर, सोमनाथ शेवाळे आणि मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अनिल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांनी आश्रमशाळांमधील मुलांची जबाबदारी गांभीर्याने पार पाडण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि प्रकल्प तसेच ‘ईश्यू’ या संस्थेला शुभेच्छा दिल्या.प्रशिक्षण सत्रांचे नेतृत्व करताना राजीव थोरात यांनी बाल संरक्षणाचे महत्त्व स्पष्ठ केले.बाबुलाल भोवर यांनी सूत्रसंचालन केले,तर प्रकल्प समन्वयक शामकांत सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. सूरज गहाला,बाबुलाल भोवर, मनीषा कोरडा,प्रवीण मौळे आणि साईनाथ यांच्या टीमने कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.हा उपक्रम जिल्ह्यातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील आदिवासी मुलांसाठी अधिक सुरक्षित, संरक्षणात्मक आणि विकासाभिमुख वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले.

