जव्हार प्रतिनिधी,
सूर्या धरणामुळे संपर्क तुटलेल्या बेंडेपाडाला होडीचा आधार,
पावसाळा सुरु झाला की बेंडेपाडा गावावर संकट येत असते. सूर्या धरण व धामणी ही दोन धरणे भरल्यावर गावाचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो.आजारी व्यक्ती, गर्भवती महिला,विद्यार्थी, वयोवृद्ध,असे सर्वच जण अडचणीत येत असतात.दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले होते.
यंदा मात्र तिलोंड्याचे माजी सरपंच परशुराम पाटारा यांचे सुपुत्र विजय पाटारा यांनी या प्रकरणात लक्ष घातले.त्यांनी थेट आ. हरिश्चंद्र भोये यांच्याशी संपर्क साधत या गंभीर परिस्थितीकडे त्यांचे लक्ष वेधले.गावकऱ्यांची अडचण ओळखून,आ.हरिश्चंद्र भोये यांनी तातडीने होडीसाठी आर्थिक निधी मंजूर केला.या मदतीमुळे आता बेंडेपाडा गावासाठी होडीची सुविधा उपलब्ध झाली आहे.त्यामुळे विद्यार्थी आता शाळेत पोहोचू शकतील,आजारी व्यक्तींना वेळीच दवाखान्यात नेता येईल आणि गाव पुन्हा तालुक्याशी जोडला गेला आहे.ही कृती केवळ मदत नाही, तर लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीची जाणीव आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.तसेच विजय पाटारा विनोद गांगोडा व दिनेश गांगोडा यांचे गावकऱ्यानी आभार मानले आहेत.

