वसंत भोईर,वाडा
नैसर्गिक नाल्यात संरक्षक भिंत बांधल्यानमुळे भातशेतीचे नुकसान
वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर रिसायकलिंग कंपन्या चिंचघरपाडा,मुसारणे ( पाटील पाडा ) या दोन गावातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत.येथे पूर्वापार असलेल्या नैसर्गिक नाल्यात टायर कंपनी मालकाने संरक्षक भिंत बांधल्याने नाल्याचे संपूर्ण सांडपाणी भातशेतीत गेले असून पेरणी केलेले संपूर्ण पीक वाया गेले असुन आता ही संपूर्ण भातशेती नापीक झाली आहे.त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. येथील शेतकऱ्यांनी यासंदर्भात निवेदन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना दिले होते.त्या अनुषंगाने आज कुडूसच्या मंडळ अधिकारी यांनी तलाठ्यांसमवेत जागेवर येऊन वस्तुस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या टायर कंपनी मालकाने शेतकऱ्यांना दमदाटी करून मनमानी पद्धतीने नैसर्गिक नाला बंद केल्यामुळे या दोन गावातील मुकुंद पाटील, उज्वला पाटील, सौरभ पाटील, प्रशांत पाटील , काळूराम पाटील, दशरथ पाटील, काशिनाथ पाटील, प्रवीण पाटील, वैभव पाटील, सागर पाटील आदी शेतकऱ्यांसह सुमारे २५ ते ३० एकर जमिनीवरील भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.या मुजोर कंपनी मालकांवर कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नैसर्गिक नाल्यामध्येच बांधकाम केल्याने सांडपाणी भातशेतीत जाऊन शेतीची नासाडी होणार आहे. त्यामुळे या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नैसर्गिक नाल्यातील पाण्याचा मार्ग बदलला आहे.नाला अरुंद केल्याने नाल्याच्या पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. त्यामुळे शेतजमिनीची नासाडी होणार आहे. या नाल्यात रसायन मिश्रित दूषित पाणी सोडण्यात येत आहे,त्यामुळे नागरिकांसह गुराढोरांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे ही संरक्षक भिंत तोडून नैसर्गिक नाला पूर्ववत करून नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक अशा या टायर कंपन्या इतरत्र हलवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या टायर रिसायकलिंग कंपन्यातून निघणाऱ्या प्रचंड धुरामुळे येथील ग्रामस्थांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत.लोकांना रात्रंदिवस उग्र वासाचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंती करूनही अधिकाऱ्यांकडून जाणून-बुजून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.
नाल्यात उभारलेली संरक्षण भिंत तोडून या प्रदूषणकारी टायर कंपन्यांविरोधात कारवाईचा बडगा उभारावा,अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील.
-काशिनाथ पाटील, शेतकरी चिंचघर पाडा,

