सुरेश वैद्य,पालघर
पोलीस पाटील हा
पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा- डॉ. भोयर,
गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. आज पालघर येथे होणारी कार्यशाळा ही महाराष्ट्रात पहिली कार्यशाळा आहे.याचा मला अभिमान असल्याचे, प्रतिपादन गृह ( ग्रामीण ),गृहनिर्माण,शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन समिती सभागृह येथे पालघर जिल्हा पोलीस पाटील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेस खा.हेमंत सवरा,आ.राजेंद्र गावित, आ.हरिश्चंद्र भोये,विधी निदेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक संजय पाटील,जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड,पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे,अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व जिल्हयातील पोलीस पाटील उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात डॉ.भोयर पुढे म्हणाले,पोलीस पाटील हा गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था बजावण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतो.मागच्या अनेक वर्षापासून पोलीस पाटील हे तुटपुंज्या २ हजार ते ३ हजार रु. च्या तुटपुंज्या मानधनावर काम करीत होते.परंतू पोलीस पाटील हा गावपातळीवर काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे मुख्यमंत्री यांनी त्यांचे मानधन १५ हजार रु. केले आहे.तसेच गेल्या काही वर्षापासून पोलीस पाटील यांची अनेक पदे रिक्त होती. ती रिक्त पदे तत्काळ भरण्यात आली आहेत.उर्वरित रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गावपातळीवर गुन्हेगारी ही वेगवेगळ्या पद्धतीची होत असते.त्याकरीता अशा अडचणी सोडण्यासाठी पोलीस पाटील यांनी सक्षम होणे गरजेचे आहे.पोलीस पाटीलानी चिंतन केले पाहीजे. तसेच गुन्हेगारीबाबत पोलीस पाटील यांना प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे.हल्ली प्रत्येक क्षेत्र हे डिजीटल होत आहे.पोलीस पाटील यांनीसुध्दा डिजीटल होणे आवश्यक आहे.आता या क्षेत्रात महिला पोलीस पाटील सुध्दा काम करत असून त्या आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत,याचा मला आनंद आहे.पालघरच्या धर्तीवर अशी कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात येईल.पोलीस पाटील यांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.उपस्थित सर्व पोलीस पाटील यांना डॉ.भोयर यांनी कार्यशाळा निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या जिल्हा पोलीस कारागृह बांधकामाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली.त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक यतिश देशमुख होते.

