दीपक मोहिते,
विक्रमगडमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक भोजन,
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक, स्वच्छ आणि ताजे मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी दररोज २५ हजार विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याची क्षमता असलेले अत्याधुनिक केंद्रीय स्वयंपाकगृह उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.या प्रकल्पासाठी सुमारे दीड एकर जागा उपलब्ध होणार असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक शासकीय परवानग्या आणि मान्यता मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विक्रमगड तालुक्यातील शालेय शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेता या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील आकडेवारीनुसार, तालुक्यातील २७३ शाळांमध्ये एकूण २९ हजार १२४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळांतील १५ हजार ९१, आदिवासी कल्याण विभागाच्या शाळांतील २ हजार ६३६ आणि अनुदानित आदिवासी शाळांतील ३ हजार ६०७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित पौष्टिक आहार उपलब्ध झाल्यास वर्गातील भूक कमी करण्याबरोबरच शाळेतील उपस्थिती, शिक्षणातील सातत्य आणि अध्ययनक्षमता वाढवण्यास मदत होऊ शकते. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होणार आहे.या नव्या प्रस्तावानुसार, केंद्रीय स्वयंपाकगृहाची अंतिम क्षमता दररोज २५ हजार भोजन तयार करण्याची असेल,मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे २ हजार ते ३ हजार विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचे नियोजन आहे. त्यानंतर आवश्यक शासकीय मान्यता, प्रत्यक्ष यंत्रणेची तयारी आणि उपलब्ध सुविधांच्या आधारे टप्प्याटप्प्याने व्याप्ती वाढवणे प्रस्तावित आहे जिल्हा परिषद शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच शासनाच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या अनुदानित आदिवासी शाळांपर्यंत मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा राज्य शासनाचा मानस असून पात्र शाळांचा टप्प्याटप्प्याने समावेश करणे आवश्यक राहणार आहे.प्रकल्पात पारदर्शकता राखण्यासाठी नियमित अहवाल, त्रयस्थ संस्थांकडून लेखापरीक्षण आणि परिणामांचे मूल्यमापन करण्याची व्यवस्थाही प्रस्तावित करण्यात आली आहे.पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित आणि दर्जेदार आहार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरणार आहे. प्रस्तावित केंद्रीय स्वयंपाकगृहाला आवश्यक मान्यता मिळून प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्यास विक्रमगड तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

