सुरेश काटे,तलासरी
तलासरीत बालविवाह नाही, पण अल्पवयीन मातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ,
कायद्याने बालविवाहावर बंदी असल्यामुळे हल्ली बाल विवाह होत नाहीत.तलासरी सारख्या आदिवासी भागात बाल विवाह होत नसले तरी अल्पवयात प्रेमसंबंधामुळे माता होण्याचे प्रमाण वाढले आहे.
प्रेमसंबंधाने विवाह न करता अल्पवयातच तरुण – तरुणी एकत्र राहत असल्यामुळे अल्पवयीन माताचे प्रमाण तलासरी भागात मोठया प्रमाणात वाढले आहे.अशी स्थिती असतानाही आरोग्य विभागाच्या दप्तरी मात्र केवळ ४० अल्पवयीन मातांची नोंद आहे.यामध्ये उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र ०३,वसा प्राथमिक आरोग्य केंद्र ०६, सूत्रकार प्राथमिक आरोग्य केंद्र ११,आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र २०,अशी आकडे वारी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव यामुळे अल्पवयातच मुली शिक्षण सोडून रोजगारासाठी बाहेर पडतात.तलासरी भागात रोजगाराच्या संधी नसल्या तरी बाजूच्या गुजरात राज्य,केंद्र शासित दादरा – नगरहवेली मध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत.या कारखान्यात तलासरी,डहाणू तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मजूर कामाला जातो.या मजुरा मध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त आहे,तेथे या अल्पवयीन मुलांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण होत असते.
नुकत्याच वयात आलेल्या या अल्पवयीन मुली कामाला गेल्यावर कामाच्या ठिकाणी आपल्या ओळखीच्या किंवा मित्राशी प्रेम झाल्याने त्या आपल्या साथदाराच्या घरी विवाह न करता राहतात व कालांतराने त्या माता बनतात. यात मुला मुलीच्या घरच्यांना काही वावगे वाटत नाही.
शाळा कॉलेज मधून आरोग्य विभाग, पोलीस अधिकारी यांच्या कडून अल्पवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात येत असते.शासन दप्तरी अल्पवयीन मातांची नोंदणीचे प्रमान कमी असले तरी मात्र तलासरी भागात अल्पवयीन मातांची संख्या जास्त आहे यावर वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर समस्यांना ला सामोरे जावे लागणार आहे.

