नदीम शेख,पालघर
१५ व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या लाखो रु.च्या निधीच्या दुरुपयोग,
१५ व्या वित्त आयोगातर्फे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था मूलभूत सेवा पुरवण्यासाठी मिळालेल्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप कुडणवासियांनी केला आहे.या निधीचा वापर स्वच्छता,पाणीपुरवठा आणि पाण्याचा पुनर्वापर,यांसारख्या कामांसाठी केला जातो.परंतु प्रशासनच्या उदासीनतेमुळे ठेकेदारांकडून नित्कृष्ट दर्जाची कामे केल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत, असाच एक प्रकार पालघर तालुक्यातील कुडण ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळाला आहे.
कुडण ग्रामपंचायत हद्दीतील “अ,” प्रभागात पंधरा वित्त आयोग योजनेतून सोलर पंप योजना,बोअरवेल व पाणी टाकी,यासाठी यंत्रणा राबवण्याच्या नावाखाली राज एंटरप्राइजेस या ठेकेदाराकडून रु.४ लाख ६८ हजार १२० रु. रकमेचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले होते. या कामात शासनाच्या निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे.करण्यात आलेल्या कामाची देयके मागील महिन्यामध्ये ठेकेदाराला अदा करण्यात आली.प्रत्यक्ष अदा करण्यात आलेल्या रकमेच्या कामांची पाहणी गावातील नागरिकांनी केली असता,सदर दोन्ही ठिकाणी खर्च केलेल्या सोलर हे नित्कृष्ट दर्जाचे असून नवापाडा येथे उभारण्यात आलेले सौर उर्जा पॅनल हे तारेच्या साहाय्याने बांधून विद्युततारेची उघड्यावर जोडणी केली आहे.येथे दाट लोकवस्ती असल्यामुळे विजेचा धक्का लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. नळजोडणीचे पाईप हे देखील दोरीच्या व तार्याच्या साहाय्याने बांधून जोडणी करण्यात आली आहे. नवापाडा येथे सुरू करण्यात आलेली संपूर्ण यंत्रणा बंद असून हातपंप व सौर ऊर्जा पॅनलवरून नियोजित केलेली नळयोजना सध्या पूर्णपणे बंद आहे.
बालशीपाडा येथे या कामात केलेल्या योजनेतील पाण्याच्या टाकीला छिद्र पडले असून पाण्याची गळती लागली आहे.सदर ठिकाणी सौर ऊर्जा यंत्रणा कंट्रोलर पॅनल व नळ जोडणी हे सुद्धा वायरच्या साहाय्याने बांधण्यात आली आहे.असा आरोप कुडणच्या ग्रामस्थांनी केला आहे.
या संपूर्ण गैरप्रकाराबद्दल या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांकडून करण्यात येणार आहे.
–मिलिंद चुरी,ग्रामस्थ,कुडण
नित्कृष्ट दर्जाचे काम झाल्याचे आरोप खोटे आहेत.सदर कामाचे एस्टिमेट व व्हॅल्यूशन झाले आहे,तसेच इस्टीमेंट व व्हॅल्यूशन झाल्यानंतरच कुठल्याही कामाचे देयक अदा करण्यात येत असते. सदर कामाला आता दोन वर्षे झाली आहेत.
-भागवत कांबळे,ग्रामसेवक, ग्रामपंचायत कुडण,

