सुरेश काटे,तलासरी,
मान्सूनपूर्व खरेदीसाठी आठवडा बाजारात शेतकऱ्यांची झुंबड,
पावसाची चाहूल लागताच मान्सूनपूर्व खरेदीला लोकांनी सुरवात केली आहे. परिसरातील आदिवासीं शेतकऱ्यांची आठवडा बाजारात सध्या झुंबड उडाली आहे.
तलासरी तालुक्यातील आजूबाजूच्या गाव खेड्यापाड्यावरील आदिवासी बांधव व शेतकरीवर्ग शेतीपूर्व कामाला लागतो.त्यामुळे त्याला तीन ते चार महिने बाजारहाट करता येत नाही. पावसाळ्यात शेती हंगाम सुरु झाल्यावर बाजारहाटासाठी जावून खरेदी करण्यास वेळही मिळत नाही.त्यामुळे तो मान्सूनपूर्व चौमासाची ( पावसाळ्याच्या हंगामात ) खरेदी करून ठेवतो.या चौमासासाठी सुकी मासळी, मसाले,कडधान्ये,डाळी,हळद, कांदे,बटाटे,चिंच,कोकम, फाटी,जनावरांसाठी पेंढा,शा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करून तीन ते चार महिने पुरेल,इतका साठा करून ठेवतो.
तलासरी तालुक्यात तलासरी, झरी,आमगाव,उधवा,कोचाई- बोरमाळ,दापचरी,धुंदलवाडी, अशा ठिकठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारात मान्सूनपूर्व खरेदीसाठी आदिवासी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होवू लागली आहे.सध्या महागाईच्या भस्मासुराने थैमान घातले असतानाही जीवनावश्यक वस्तूची खरेदी मोठ्याप्रमाणात होत आहे. कारण तीन महिने शेती हंगाम सुरु झाल्यावर येथे लागणाऱ्या वस्तू आणण्यापासून ते सर्वच गोष्टीकरिता शेतकऱ्यांना अडचणीना सामोरे जावे लागत असते.कारण ग्रामीण भागात पावसाळ्यात पाहिजे ती वस्तू मिळत नाही.
गुजरात राज्यामधील उंबरगाव,संजान,खत्तलवाडा, मरोली,फणसा या भागातून सुकी मासळी विक्रेत्या महिला तलासरी भागात विक्रीसाठी येत असतात.
या बाजातात दाढा, सुरमई,घोळ,मुशी,करली, मांदेली,बोंबील,जवळा, कोळंबी,वागटी,बांगडे, कोळीब,सुकट,खारे,लसिंगे अशा विविध प्रकारच्या सुक्या मासळीचा समावेश असतो. त्याला मागणीही चांगली असते..
आदिवासी महिला भात व कडधान्ये देवून सुक्या मासळीची खरेदी करीत असतात.पावसाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात विक्री सुरु असल्याने सुक्या मासळी विक्रेत्यांचा धंदा तेजीत असतो.सध्या या आठवडे बाजारात मान्सूनपूर्व खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
यंदा सुकी मासळी दुपटीने महागली असले तरी त्याचा परिणाम खरेदीवर झालेला नाही.

