दीपक मोहिते,
” निर्लज्जपणा,”
गिर गया,फिर भी टांग उपर,
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जी सैन्य कारवाई केली.त्याने पाकिस्तानला त्यांची युद्धक्षमता दाखवून दिली. ७ ते १० मे दरम्यान झालेल्या चार दिवसाच्या यूद्धात पाकिस्तानने भारताकडून जबर मार खाल्ला. पाकिस्तानची सैन्य प्रतिष्ठा धुळीस मिळाली.मात्र, त्यानंतरही पाकिस्तानला अक्कल आलेली नाही. पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्कर प्रमुख असिम मुनीरने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे.इस्लामाबाद,दक्षिण आशियामध्ये भारताचे वर्चस्व कधीच मान्य करणार नाही, असं आसिन मुनीरने म्हटलं आहे.स्वतःचा देश यूद्धात हरल्यानंतरही स्वत:ला फिल्ड मार्शल पदवी लावून घेणारा आसिम मुनीर हा पहिलाच लष्करप्रमुख असावा. भारताने सिंधू जल करार स्थगित करुन पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे.भारताने केलेल्या या वॉटर स्ट्राइकचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
पाकिस्तानची जलकोंडी सुरु झाली आहे.
त्यामुळे पाकिस्तानातून पुन्हा आक्रमक भाषा सुरु झालीय. पाकिस्तानी सैन्याची मीडिया विंग,इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन्स नुसार,आसिम मुनीरने ही टिप्पणी विविध विश्वविद्यालयाचे कुलपती, मुख्याध्यापक,वरिष्ठ शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा करताना केली.
सिंधू जल करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना असिम मुनीरने ही पाकिस्तानसाठी लक्ष्मण रेखा असल्याच म्हटलं आहॆ.इस्लामाबाद,पाणी या संवेदनशील विषयावर कधीच झुकणार नाही,असही मुनीर म्हणाला. “ पाणी पाकिस्तानची रेड लाइन आहे.आम्ही २४ कोटी पाकिस्तानी नागरिकांच्या या मौलिक अधिकारावर कोणतीही तडजोड करणार नाही,” हे असिम मुनीरचे शब्द आहेत.पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांची हत्या केली.त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.१९६० साली हा करार उभय देशात झाला होता.सिंधू जलकरार सहा नद्या सिंधु, झेलम,चिनाब, रावी, बियास आणि सतलज यावर अवलंबून आहे.भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने वारंवार इशारे दिले. पण भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.

