दीपक मोहिते,
आंतरराष्ट्रीय घडामोडी,
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द गाजणार,
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा व त्यांच्यासोबत जेडी वेन्स यांनी पहिल्यांदा उपाध्यक्षपदाची शपथ घेतली.गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून अत्यंत कमी फरकाने पराभूत झालेल्या ट्रम्पने या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा शेवटच्या टप्यात ७० मतांनी पराभव केला.या लढतीत ट्रम्प यांना २९३ तर हॅरिस यांना २२३ मते मिळाली.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्यासाठी बहुमताचा २७० हा आकडा गाठावा लागतो.या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यापासून हॅरिस या ट्रम्प यांच्या वाढत्या मतांचा आकडा शेवटपर्यंत गाठू शकल्या नाहीत.
शपथविधी झाल्यानंतर ट्रम्प यांनी,आपल्या पहिल्या वहिल्या भाषणात आपण ” अमेरिका सर्वप्रथम,” या धोरणानुसार काम करणार असल्याचे जाहीर केले आहे.त्यासाठी जगातले सर्वात बलवान असे अमेरिकेचे लष्कर उभारणार असल्याचे स्पष्ट केले.त्यांच्या या निर्णयामुळे अनेक देश अचंबित झाले असून त्यांच्या कार्यकाळात जगाची वाटचाल,ही तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.मेक्सिकोमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर आणीबाणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.तसेच स्थलांतरण व व्हिसा विषयक कायदे कडक करण्याचे त्यांनी यावेळी संकेत दिले आहेत.तसेच बायडेन प्रशासनाने लागू केलेले सुमारे १०० आदेश बदलण्याचे ठरवले आहे.देशात बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या लोकांना देशाबाहेर काढण्यासाठी ते पावले उचलणार आहेत.त्यांच्या या ऍक्शन प्लॅनमुळे परकीय नागरिकांचे धाबे दणाणले आहे.जगातील अनेक देशाचे लक्ष त्यांच्या व्यापार धोरणाकडे लागले आहे.मेक्सिको व कॅनडा या देशातून आयात होणाऱ्या सर्व वस्तूवर २५ % शुल्क लावण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.तर चीनमधून येणाऱ्या वस्तूवर ट्रम्प १० % शुल्क लावण्याच्या तयारीत ते आहेत.तसेच आपल्या पहिल्याच भाषणात दहशतवाद कधीच खपवून घेतला जाणार नाही,असा खणखणीत इशारा त्यांनी दहशतवादी संघटनांना दिला आहे.त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वीच इस्त्रायल व हमास या दोघांनी युद्धबंदी केली असून एकमेकांचे ओलीस हस्तांतरण करणे,सुरू केले आहे.ट्रम्प यांचा स्वभाव हा अत्यंत आक्रमक असल्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कसलीही तमा न बाळगता निर्णय घेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे जगात पुन्हा शीत युद्धाचे वारे वाहण्यास सुरुवात होईल,अशी भिती आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषकाना वाटू लागली आहे.रशियाच्या विस्तारवादी धोरणाला पायबंद घालण्यासाठी ट्रम्प हे,नाटो ( नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन )
संघटनेतील देशांना आपल्या काळात भरपूर प्रमाणात रसद पुरवतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

