संगीता तावडे,मंत्रालय प्रतिनिधी
पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक संपन्न.
वसईच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये (१) अर्नाळा किल्ला आणि ७ गावे (२)अर्नाळा गाव व १६ गावे तसेच (३) तिल्हेर गाव व १२ गावे,अशा तीन योजनांचा समावेश आहे.
या तीन योजनांना सन २००८ मध्ये शासनाने मंजूरी दिली होती.मात्र त्यावर कोट्यावधी रु.चा निधी खर्च होऊनही या योजना पूर्ण झाल्या नाहीत.त्यानंतर शासनाने पुन्हा सन २०२२ मध्ये या योजनांना नव्याने मंजूरी देऊन त्याप्रमाणे कार्यादेश देण्यात आले.मात्र निविदेनुसार विहीत कालावधी पूर्ण होऊनही या योजनांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत.
याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पालघर,जिल्हा परिषद पालघर तसेच वसई – विरार शहर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत यापूर्वी ३ बैठका झाल्या.या बैठकांदरम्यान या सर्व गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू व्हावा,यासाठी आज गुलाबराव पाटील, पाणीपुरवठामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस वसईच्या आ. स्नेहा दुबे – पंडीत,पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे तसेच प्रशांत भामरे,मुख्य अभियंता , महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व अजय सिन्हा,अधिक्षक अभियंता,मजिप्रा ( मुंबई) , आणि कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे तसेच म.जि.प्रा. पालघरचे कार्यकारी अभियंता अजय मुळे आणि जिल्हा परिषद पालघरचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाध्ये हे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मागील काही वर्षापासून रखडलेल्या या योजनांची आकडेवारी तसेच तपशीलवार माहिती सादर करण्यात आल. या प्रकरणी शासनाने लक्ष घालून योग्य ते आदेश देण्याची विनंती पाणीपुरवठामंत्री यांना केली.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे तसेच एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीवर टॅपिंग करण्याची कार्यवाही त्वरेने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्रिमंहोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच नोव्हेंबर – डिसेंबरपर्यंत या तीन्ही योजनांमधील सर्व गावांना पाणीपुरवठा होईल याविषयीची दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित विभागाना देण्यात आल्या.
त्याचप्रमाणे या योजनांची कामे गुणवत्तापूर्ण असतील यासाठी स्वतंत्र यंत्रणेतर्फे तपासणी करून घेण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

